कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते !

कोरोनाच्या संकटकाळात सैरभैर झालेल्या सामान्य नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आदर्शच आहेत. हाच आदर्श घेऊन अन्य कार्यकर्ते आणि संघटना यांनीही नागरिकांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे !

सोलापूर, २६ एप्रिल (वार्ता.) – येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक लोकांना वैद्यकीय साहाय्याची आवश्यकता निर्माण होत आहे. अशा स्थितीत ‘सेवा परमो धर्म:।’ या श्‍लोकाप्रमाणे येथील काही सामाजिक कार्यकर्ते कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी कार्यरत झाले आहेत. येथील बालराज कैरमकोंडा, शाम पेगडा, तुषार मोरे, तसेच गुरु रापोल या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला आहे. हे कार्यकर्ते प्रतिदिन शेकडो गरजू लोकांना कोरोना संदर्भात आवश्यक ती सर्व प्रकारची वैद्यकीय क्षेत्रातील माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना दिशादर्शनही करत आहेत. गरजूंना कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती देणे, वाहन उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, यांसमवेत वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक ते साहाय्य ते करत आहेत. हे कार्यकर्ते जिल्ह्यातील विविध रुग्णालयांच्या संपर्कात असून ते रुग्णांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देत आहेत. विशेष म्हणजे हे सामाजिक कार्यकर्ते सर्व कार्य विनामूल्य करत असून सोलापूर जिल्ह्यातील गरजू लोकांसह अन्य जिल्ह्यांतील नागरिकांनाही साहाय्य करत आहेत.

एका व्यक्तीचे प्राण वाचले, तरी समाधान लाभते ! – बालराज कैरमकोंडा

या संदर्भात श्री. बालराज कैरमकोंडा यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेमके कोणत्या रुग्णालयात भरती करावे, कसे करावे यांसह अनेक अडचणी त्यांच्यासमोर आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. आपल्या साहाय्यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले तरी मनाला समाधान लाभते.’’

कोरोनाच्या संदर्भात ज्यांना साहाय्य हवे आहे, त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढील क्रमांकावर संपर्क साधावा

श्री. बालराज कैरमकोंडा – ७८४१९४३४३३, श्री. शाम पेगडा – ७४९९४४००१८, श्री. तुषार मोरे – ९५९५६६५६६८, श्री. गुरु रापोल ९३२२५५४४३२