परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. आपत्कालीन परिस्थिती असूनही गुरुदेवांनी सत्मध्ये ठेवल्याने कृतज्ञता वाटणे

‘जन्मोत्सवाच्या कालावधीतील हे चार दिवस माझ्या शाळेचे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण (Online training) होते. या परिस्थितीत मी सकारात्मक राहून दोन्ही दिवस सत्संगाचा लाभ घेतला. कार्यक्रम बघतांना मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत होत होता. ‘बाहेर एवढी आपत्कालीन परिस्थिती असूनही गुरुदेव आपल्याला सत्मध्ये ठेवत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.’ – सौ. रेवती प्रभूदेसाई, बोरी

२. कार्यक्रम बघतांना गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे आणि आत्मनिवेदनाचा भाग वाढणे

‘दोन्ही दिवस कार्यक्रम बघतांना गुरुदेवांनी मला घरबसल्या सत्संग दिल्यामुळे गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत होत होता. कार्यक्रमात गुरुदेवांना बोलतांना पाहून ‘ते माझ्याशीच बोलत आहेत’, असे वाटून आनंद जाणवत होता. कार्यक्रम बघितल्यावर आत्मनिवेदनाचा भाग वाढला. ‘मला देवाच्या चरणांशी जायचे आहे’, असा विचार मनात येऊन देवाचा धावा केला जातो.’ – सौ. भारती गावकर, बोरी

३. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘आम्हाला चालता, बोलता देव बघायला मिळाला’, असे वाटून पुनःपुन्हा भाव जागृत होणे

‘जन्मोत्सव सोहळ्याचे दोन्ही दिवस भावसोहळा पहातांना पुष्कळ भाव जागृत होत होता. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांच्या पाठीमागे पांढरे वलय दिसत होते. ‘आम्ही प्रत्यक्षात देव कधी बघितला नाही; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला चालता, बोलता देव बघायला मिळाला’, असे वाटून पुनःपुन्हा भाव जागृत होत होता. आम्ही सनातन संस्थेत येऊन पुष्कळ काही शिकलो. ‘गुरुदेव पुष्कळ साधेपणाने रहातात. त्यांच्यात अजिबात अहं नाही’, याची परत परत आठवण होऊन भावजागृती होत होती.’ – श्रीमती श्रद्धा नाईक, बोरी

४. ‘गुरुमाऊली प्रत्यक्षात घरी येणार आहे’, असा भाव ठेवून घराची स्वच्छता करणे आणि भावजागृती होणे

‘जन्मोत्सवाच्या आदल्या दिवसापासून माझा भाव जागृत होत होता. गुरुदेवांनी एक विज्ञापनाची (जाहिरातीची) सेवा देऊन भावस्थितीत ठेवले. ‘गुरुदेव आपल्या घरी येणार म्हणून काय आणि कशी सिद्धता करू ?’, असेच विचार मनात येत होते. श्री गणेशचतुर्थीला घराची स्वच्छता करतो, त्याप्रमाणे मी घराची स्वच्छता केली. सोहळा बघतांना पुनःपुन्हा भाव जागृत होत होता. दुसर्‍या दिवशी गुरुमाऊली प्रत्यक्षात आपल्या घरी आली; म्हणून माझा भाव जागृत होत होता आणि मन भरून येत होते.’ – सौ. प्रज्ञा प्रकाश नाईक, बोरी

५. गुरुदेव घरी येणार; म्हणून घराची स्वच्छता करणे आणि सोहळा पहातांना भाव जागृत होणे अन् घरामध्ये चैतन्य जाणवणे

‘जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेव घरी येणार; म्हणून आदल्या दिवशी आम्ही घराची स्वच्छता केली. ‘आपत्काळ असूनही गुरुदेवांनी बाहेर न पडता घरीच आम्हाला हा सोहळा अनुभवायला दिला’, यासाठी त्यांच्या चरणी पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त होत होती. जन्मोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सोहळा बघतांना भाव जागृत होत होता. आमच्यात पुष्कळ स्वभावदोष आहेत. ते घालवण्यासाठी गुरुदेव प्रत्येकाला मार्गदर्शन करतांना पाहून माझा भाव जागृत होत होता. घरात पुष्कळ आनंद आणि चैतन्य जाणवत होते.’ – श्री. प्रकाश नाईक, बोरी

६. वर्षभर बंद पडलेला भ्रमणसंगणक साधकांना कार्यक्रम पहाता यावा; म्हणून चालू होणे आणि कार्यक्रमात गुरुदेवांना पाहून भावजागृती होणे

‘जन्मोत्सव सोहळा भावसोहळा आहे; म्हणून एक वर्षापूर्वी बंद पडलेला भ्रमणसंगणक (लॅपटॉप) उपाय करून ‘चार्जिंग’ला लावला, तर तो चालू झाला. ‘केवळ आणि केवळ साधकांना तो सोहळा बघता यावा’, यासाठी गुरुमाऊलीनेच तो चालू केला; म्हणून माझा भाव जागृत होत होता. जन्मोत्सव सोहळ्याला गुरुदेवांना बघून भाव जागृत होत होता. मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते.’ – कु. प्रीती प्रकाश नाईक, बोरी

७. जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू झाल्यावर पोटात दुखू लागल्यावर उपाय करूनही लाभ न होणे आणि गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर पोटात दुखायचे थांबणे

‘जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी पहाटे ५ वाजता माझ्या पोटात कोणतेही कारण नसतांना दुखायला लागले. नामजपादी उपाय करून मी प्रार्थना केली. एक घंट्याने पोटात दुखायचे थांबले. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त असलेला कार्यकम बघतांना दुपारी ४.३० वाजता माझ्या पोटात परत  दुखायला लागले. मग परत उपाय केले, आवरण काढले आणि कापूर लावला. न्यास करून नामजप केला, तरी पोट दुखायचे थांबत नव्हते. त्या वेळी गुरुमाऊलींना पूर्ण शरण जाऊन प्रार्थना केली. ‘गुरुमाऊली, आता तुम्हीच काय ते करा. तुमच्याच कृपेने पोटात दुखायचे थांबू दे देवा.’ त्यानंतर दोन मिनिटांत पोटात दुखायचे थांबले. ही गुरुमाऊलींनी दिलेले मोठी अनुभूती ! शेवटचा कार्यक्रम बघतांना भाव जागृत झाला. पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर बोलत असतांना अश्रू अनावर झाले. पूर्ण कार्यक्रम भावमय झाला.’ – सौ. निलांगी श्रीकांत देसाई

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक