देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही मासांपूर्वी देहलीतील आरोग्यविषयक सुविधांवर पुष्कळ व्यय करून त्या कशा चांगल्या केल्या आहेत, याची विज्ञापने वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केली. आरोग्यविषयक सेवा चांगल्या प्रकारे देत आहोत, असे त्यातून दाखवायचे होते. त्या उलट आता कोरोनाच्या प्रकोपात देहलीतील आरोग्य सेवांचा उडालेला बोजवारा दिसून येतो. देहलीत ऑक्सिजनची न्यूनता आहे. केंद्र सरकारने देहलीत ८ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी पैसे देऊनही केवळ १ प्रकल्प उभा राहिला आहे. २५ एप्रिल या दिवशीच देहलीत ऑक्सिजन न मिळाल्याने २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण ऑक्सिजन सिलिंडर, ‘बेड’ मिळवण्यासाठी तडफडत आहेत. देहलीत कोरोनाचा कहर झाला आहे. स्मशानभूमी धगधगत आहे, तर लोक वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी आक्रोश करत आहेत.
देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ऑक्सिजन मिळण्यासाठी हात पसरले आहेत. त्यातही केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोनाच्या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खासगी बैठकीचा तपशील प्रसारमाध्यमांमध्ये उघड करण्याची चूक केली. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना खडसावल्यावर त्यांनी सारवासारव केली. केजरीवाल यांनी केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा न करण्याविषयी जे आरोप केले आहेत, त्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रतिवाद करून ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याची माहिती दिली आहे. यावरून केजरीवाल ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी राजकारण करत आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतो. जर हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीत तथ्य असेल, तर केजरीवाल कोरोना संसर्गाचा वापर केंद्र सरकारवर आसूड ओढण्यासाठी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. याविषयी आता जनतेनेच केजरीवाल यांना प्रश्न विचारणे आवश्यक !