कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रेमडेसिविर : समज आणि अपसमज !

डॉ. ज्योती काळे

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. खरेतर प्रशासकीय स्तरावर बघायचे झाल्यास कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, त्या वेळीच अनेक तज्ञ ‘कोरोनाची दुसरी लाट येणार आणि ती भयावह असणार’, असे सांगत होते. असे असतांनाही नागरिकांपासून ते प्रशासन अशा सर्वच स्तरांवर सर्वजण गाफील राहिल्याने आज देशात प्रतिदिन सहस्रो नागरिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. विशेष करून महाराष्ट्र आणि त्यातही पुण्यामध्ये या रुग्णांचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या मधल्या कालावधीत खरेतर ती थोपवण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.

सद्यःस्थितीत सर्व रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणे, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळणे दुरापास्त झाले आहे. यातच या विषाणूवर उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या ‘रेमडेसिविर’ या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. देशातील औषधाचे उत्पादन मागणीच्या प्रमाणात वाढवण्यासाठी ते बनवणार्‍या आस्थापनानेही प्रयत्न चालू केले आहेत. आज संपूर्ण भारतात जेवढे उत्पादन होते, त्याच्या अर्धे केवळ पुणे शहरासाठी आवश्यक आहे. याचाच अपलाभ घेत त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी काळाबाजार चालू आहे.

रेमडेसिविर औषधाविषयी काही महत्त्वपूर्ण सूत्रे

१. कोरोना रुग्णावर रेमडेसिविरचा होणारा उपयोग

याला मुळातच ‘रोगाच्या शोधात असणारे औषध’, असे म्हटले आहे; कारण हे जेव्हा निर्माण झाले, तेव्हा त्याचा वापर ‘झिंका’ विषाणू आणि नंतर ‘इबोला’ विषाणू यांसाठी करण्यात आला; परंतु त्याचा फारसा प्रभाव न झाल्याने आता कोरोना विषाणूवर त्याचा प्रयोग करण्यात आला आणि काही प्रमाणात तो यशस्वीही झाला. या औषधामुळे कोरोनाचा विषाणू मरत नाही, तर त्याची शरिरात होणारी वाढ रोखण्याचे कार्य ते करते. असे असले, तरी जगभरातील अनेक चाचण्यांतून कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्यासाठी याचा उपयोग असल्याचे सिद्ध झालेले नाही. या औषधामुळे रुग्णाची लक्षणे म्हणजे ताप, अंगदुखी आणि ऑक्सिजनची आवश्यकता याचे प्रमाण अल्प होते. काही अनुभवानंतर असे लक्षात आले की, मध्यम प्रकारचा संसर्ग असणार्‍या रुग्णांमध्येच रेमडेसिवीर उपयोगी पडू शकते. ज्यांना सौम्य किंवा पुष्कळ तीव्र प्रकारचा संसर्ग आहे, त्यांच्यासाठी हे औषध विशेष उपयोगाचे नाही. त्यामुळे याचा वापर हा अधिक सजगपणे करणे आवश्यक आहे.

प्रारंभी रेमडेसिविरला पहिल्या फळीतील औषधाचा दर्जा दिला गेला आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर चालू झाला; परंतु आपल्या देशाची आवश्यकता पहाता उत्पादनक्षमता पुष्कळच अल्प होती. त्यामुळे याचा तुटवडा भासू लागला. सध्या ते बनवणार्‍या आस्थापनाने उत्पादन क्षमता वाढवली आहे.

२. रेमडेसिविरची होणारी साठेबाजी आणि काळाबाजार

रुग्णांच्या नातेवाइकांना ‘या औषधाविना पर्याय नाही’, असे वाटू लागले आणि अनेकदा रेमडेसिविर देण्याविषयी ते आग्रही भूमिका घेतात. यातूनच रुग्णासाठी औषध घेऊन ठेवणे ज्यांना परवडते, त्यांच्याकडून त्याचा वापर करण्याचा भाग चालू झाला. यातूनच पुढे काही औषध विक्रेत्यांनी याची साठेबाजी करण्यास प्रारंभ केला आणि या औषधाचा काळाबाजार चालू झाला.

३. कोरोना रुग्णावर रेमडेसिविर व्यतिरिक्तही अन्य उपचार शक्य

आज जेव्हा कोरोनाचा रुग्ण रुग्णालयांमध्ये भरती होतो, त्या वेळी रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्यानेच तो अर्धा खचून जातो. अशा वेळी रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाइक यांनी समजून घेतले पाहिजे की, या औषधाच्या व्यतिरिक्तही इतर उपचार जसे की, ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, इतर अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि व्हिटॅमिन्स यांचाही लाभ होतो. त्यामुळे रेमडेसिवीर न मिळाल्याने हताश न होता आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा. स्वत:ची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सकस आणि पुरेसे अन्न अन् फळे खाणे या गोष्टी निश्‍चितपणे महत्त्वाच्या आहेत.

४. रेमडेसिविरविषयीची पुण्यातील स्थिती

सरकारी आदेश आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार हे औषध केवळ कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले; परंतु त्याची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येते की, साधारणपणे ६० ते ६५ टक्के रुग्णांना पुरतील, एवढेच डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, म्हणजेच उरलेल्या रुग्णांना ते उपलब्ध होणे अवघड आहे किंवा ते अन्य मार्गाने घ्यावे लागतील, हे उघड आहे.

५. काळाबाजार थांबवण्यासाठी उपाययोजना

सरकारने खासगी औषध विक्रेत्यांना हे औषध विकण्याची बंदी घातली आहे; परंतु तरीही त्याचा काळाबाजार चालूच आहे. हे सर्व टाळायचे असेल, तर प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

यासमवेतच नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे, हाच त्यावर उपाय आहे.

डॉ. ज्योती काळे, पुणे

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]