‘आपण केवळ प्रयत्न करायचा अवकाश, गुरुमाऊली भरभरून देते’, याची ग्रंथांच्या वितरणाच्या माध्यमातून प्रचीती घेणार्‍या रत्नागिरी येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली करंबेळकर !

‘हिंदु धर्मातील विविध सण आणि उत्सव साजरे करण्याचे शास्त्र भावी पिढीला कळावे आणि समाज धर्माचरणी अन् सात्त्विक व्हावा’, यासाठी सनातन संस्थेने आतापर्यंत विविध विषयांवरील अनेक ग्रंथ आणि लघुग्रंथ प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांच्या वितरणाची सेवा करतांना रत्नागिरी येथील सौ. अंजली करंबेळकर यांनी अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी या लेखात देत आहोत.

सौ. अंजली करंबेळकर

१. गणेशोत्सवाच्या कालावधीत देवाने करवून घेतलेली ग्रंथांच्या वितरणाची सेवा

१ अ. देवाला प्रार्थना करून त्याने सुचवल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या कालावधीत १५ सहस्र लघुग्रंथांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट घेणे : ‘मी देवाला प्रार्थना करून विचारले, ‘या वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत मी किती ग्रंथांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट घेऊ ?’ त्या वेळी देवाने सांगितले, ‘१५ सहस्र लघुग्रंथांचे वितरण करण्याचेे उद्दिष्ट घे.’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘देवाने सुचवले, म्हणजे देवच उद्दिष्ट पूर्ण करून घेईल.’ त्यानंतर मी देवाला विचारले, ‘देवा, मी कोणत्या ग्रंथांचे वितरण करण्यास प्राधान्य देऊ ?’ त्या वेळी मला समाजातील व्यक्तींकडून मागणी येण्यापूर्वीच देवाने सुचवल्याप्रमाणे मी दायित्व असलेल्या साधकाकडे ग्रंथांची मागणी केली.

१ आ. दळणवळण बंदीमुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होणार नसल्याने देवाने शाळांमध्ये ग्रंथांचे वितरण करण्याचे सुचवणे आणि ‘देवाचे कार्य देवच कसे करून घेतो’, हे शिकायला मिळणे : मी सेवेला आरंभ केला आणि गुरुमाऊलीच्या कृपेने ४ सहस्र ग्रंथांची मागणी मिळाली. नंतर कोरोनाच्या संसर्गामुळे दळणवळण बंदी चालू झाली. त्या वेळी मी देवाला शरण जाऊन विचारले, ‘देवा, या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होणार नाही, तर मी काय करू ?’ तेव्हा देवाने सांगितले, ‘या वर्षी शाळांमध्ये ग्रंथ देऊ शकतो.’ देवाने सुचवल्याप्रमाणे मी शाळांची नावे काढली आणि ‘त्या शाळांचे माजी विद्यार्थी कोण आहेत ?’, याची माहिती घेतली. काही माजी विद्यार्थ्यांना भ्रमणभाषवर संपर्क केले. गुरुमाऊलीच्या कृपेमुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ६ सहस्र ग्रंथांची मागणी मिळाली. त्या वेळी ‘देवच त्याचे कार्य कसे करून घेतो ?’, हे मला शिकायला मिळाले.

२. ग्रंथांच्या वितरणासाठी प्रयत्न करतांना ज्या लोकांची नावे डोळ्यांसमोर आली, त्यांना भ्रमणभाष करून ग्रंथांची माहिती सांगितल्यावर ७०० ग्रंथांची मागणी मिळणे

ग्रंथांचे वितरण करण्यासाठी प्रयत्न करतांना ज्या लोकांची नावे माझ्या डोळ्यांसमोर आली आणि त्यांना भ्रमणभाष केले. त्यांनी ज्या ग्रंथांची मागणी केली होती, त्या ग्रंथांचे छायाचित्र आणि त्याचे मूल्य त्यांना भ्रमणभाषवर पाठवले, तसेच त्यांना ग्रंथांची माहितीही सांगितली. त्याचा चांगला परिणाम होऊन ७०० ग्रंथांची मागणी मिळाली.

३. एक शिक्षक सेवानिवृत्त होणार होते. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही सेवानिवृत्त होण्यापूर्वी शाळेला ग्रंथ भेट देऊ शकता.’’ त्या वेळी त्यांंनी लगेचच ५०० ग्रंथांची मागणी केली.

४. खेड येथील माजी नगराध्यक्षांना ‘कोरोना’च्या साथीत प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी सांगितलेला नामजप चालू आहे ना ?’, हे विचारण्यासाठी भ्रमणभाष करणे, त्या वेळी त्यांनी ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र’ या १ सहस्र लघुग्रंथांची मागणी करणेे

मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी खेड येथे गेले होते. त्या वेळी माझी तेथील माजी नगराध्यक्षांशी भेट झाली होती. मी त्यांना ‘कोरोना’च्या साथीत स्वतःची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सनातनने सांगितलेला नामजप करायला सांगण्यासाठी भ्रमणभाष केला होता. काही दिवसांनंतर मी त्यांना ‘नामजप चालू आहे ना ?’, हे विचारण्यासाठी पुन्हा भ्रमणभाष केला. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘ताई, या ४ दिवसांत माझा नामजप झाला नाही’, हे तुम्ही कसे ओळखले ?’’ त्या वेळी ‘देवानेच मला सुचवले; म्हणून तुम्हाला भ्रमणभाष केला’, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘सध्या काय सेवा चालू आहे ?’’

तेव्हा मी सांगितले, ‘‘देवाच्या ग्रंथांची ज्ञानगंगा समाजात पोेचवण्याची सेवा चालू आहे.’ त्या प्रसंगी मी त्यांना ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र’ या लघुग्रंथांची माहिती अन् मूल्य सांगितले. त्यांनी ‘मला १ सहस्र ग्रंथ द्या’, असे सांगितले. त्या वेळी मी त्यांना सुचवले, ‘‘तुमच्याच हस्ते खेड येथील शाळेत हे ग्रंथ देऊया.’’ त्यावर त्यांंनी लगेच होकार दिला. त्या वेळी माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. या प्रसंगातून मी गुरुमाऊलीची अपार कृपा अनुभवली आणि ‘देवाने उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांना सिद्ध ठेवले असून आपण केवळ तिथे पोचायचे आहे’, हे मला शिकायला मिळाले.

५. राजापूर येथील व्यक्तीने ग्रंथांची मागणी करणे

५ अ. राजापूर येथील साधक श्री. खडपे यांना एक चांगली व्यक्ती भेटली होती. मी त्यांना भ्रमणभाषवरून ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्यांनी लगेच १ सहस्र ग्रंथांची मागणी दिली.

५ आ. आगामी आपत्काळासाठी आवश्यक असलेल्या ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्या गृहस्थांनी ४ ग्रंथांचा १ संच, अशा १० संचाची मागणी करणे : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मला आगामी आपत्काळासाठी आवश्यक असणार्‍या ४ मोठ्या ग्रंथांची नावे सांगितली आणि ‘ते ग्रंथही समाजात देऊ शकतो. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा’, असे सांगितले होते. त्यानंतर मी देवाला प्रार्थना करून त्या गृहस्थांना आगामी आपत्काळासाठी आवश्यक असलेल्या ४ ग्रंथांची माहिती सांगितली. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही हे ग्रंथ तुमचे नातेवाईक आणि परिचित यांना देऊ शकता. तुम्ही ४ ग्रंथांचा १ संच, असे १० संच घेऊन देऊ शकता. यातून तुमचीही सेवा होईल आणि ती देवाला आवडेल.’’ त्यानंतर त्यांनी लगेच ४ ग्रंथांचा १ संच, अशा १० संचाची मागणी केली. त्या वेळी ‘केवळ गुरुमाऊलीची कृपा आणि सद्गुरु स्वातीताईंचा संकल्प’ यांमुळेच हे अनुभवता आले’, याची मला सतत जाणीव होत होती.

६. नातेवाइकांकडून लाभलेला प्रतिसाद 

६ अ. एका नातेवाइकांना ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा !’, या ग्रंथाची माहिती सांगितल्यावर त्यांनी लगेच ५०० ग्रंथांची मागणी करणे : मी एका नातेवाइकांना भ्रमणभाषवर ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा !’ या ग्रंथाची माहिती सांगितली. त्यांंना माहिती एवढी आवडली की, त्यांनी लगेचच ५०० ग्रंथांची मागणी केली, तसेच ‘मी प्रत्येक वर्षी ५०० ग्रंथ घेईन’, असेही सांगितले. हे ऐकल्यावर ‘प.पू. गुरुमाऊलीची केवढी कृपा आहे’ आणि ‘त्यांचा संकल्प कसा कार्यरत होतो’, हे मी अनुभवले. ‘आपण केवळ प्रयत्न करायचा अवकाश, गुरुमाऊली भरभरून देते’, याची मला प्रचीती आली.

६ आ. मी अन्य एका नातेवाइकांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी गुरुपौर्णिमेसाठी अर्पण दिले आणि ५०० ग्रंथांची मागणीही दिली.

७. एका विज्ञापनदात्यांना ग्रंथाविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी ५०० ग्रंथांची मागणी दिली.

८. दापोली येथील एका दुकानदाराने त्याची वादळात पुष्कळ हानी झालेली असूनही ३०० ग्रंथ घेेणे

मी दापोली येथील एका दुकानदारांना भ्रमणभाषवर संपर्क करून ‘कोरोना’च्या साथीत स्वतःची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सनातनने सांगितलेला नामजप करण्यास सांगितले होते. मध्यंतरीच्या काळात दापोलीला पुष्कळ मोठे वादळ झाले होते. त्या वेळी मी त्यांना भ्रमणभाष करून ‘तुम्ही नामजप करत आहात ना ?’, असे विचारले आणि ‘त्यांची वादळात काही हानी झाली का ?’, याविषयीही विचारपूस केली. त्या वेळी त्यांनी पोफळी आणि काजू यांची मोठी झाडे पडून पुष्कळ हानी झाल्याचे सांगितले. हे सांगत असतांना ‘ते स्थिर आहेत’, हे लक्षात आल्यावर मी त्यांना ‘टी.व्ही. मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम’ या ग्रंथाची माहिती सांगितली. त्यांची पुष्कळ हानी झाली असूनही त्यांनी लगेच ३०० ग्रंथांची मागणी केली.

९. अनुभवलेली गुरुकृपा 

९ अ. गुरुमाऊलीच्या कृपेने आतापर्यंत ७ वर्षांत गणेशोत्सव, दीपावली आणि मकरसंक्रांत या सणांच्या वेळी ५० सहस्र लघुग्रंथ वितरित झाले आहेत.

९ आ. माझे २ वर्षांपूर्वी मोठे शस्त्रकर्म झाले. मला मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचाही त्रास आहे. असे असूनही गुरुमाऊली मला या ग्रंथांच्या सेवेतून आनंदात ठेवत आहे.

१०. प्रार्थना आणि कृतज्ञता !

‘हे भगवंता, ‘माझ्याकडून अशीच सेवा व्हावी’, यासाठी तूच मला शक्ती आणि बुद्धी दे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. मी ही सेवा केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच करू शकले. मी प.पू. गुरुमाऊली, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अंजली हनुमंत करंबेळकर, रत्नागिरी (२३.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक