नाकाद्वारे देण्यात येणार्‍या ‘नेझल स्प्रे’ लसीवर संशोधन चालू !

चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम

नवी देहली – सध्या देशात आणि जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे. लसीचे दोन डोस इंजेक्शनद्वारे देण्यात येत आहेत; मात्र लवकरच नाकावाटे स्प्रे मारून लस देण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये नाकातून घेतला जाणारा स्प्रे (नेझल स्प्रे) कोरोना रोखण्यात यशस्वी होतांना दिसत आहे.

१. वँकोवर येथील ‘सॅनोटाईज’ आस्थापनाने हा नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे विकसित केले आहे. नेझल स्प्रे कोरोना रुग्ण स्वतः आपल्या नाकात टाकू शकतात. एकदा हा स्प्रे नाकात टाकल्यास विषाणूंचे प्रमाण न्यून होते. या स्प्रेमुळे व्हायरस वाढत नाही तसेच फुप्फुसांनाही काहीच हानी होत नाही.

२. कॅनडा आणि ब्रिटन येथे याच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात ७९ कोरोनाबाधितांवर दोन टप्प्यांमध्ये प्रयोग करण्यात आले. हा नेझल स्प्रे २४ घंट्यांच्या आत ९५ टक्के विषाणू न्यून करत असल्याचे समोर आले आहे. तर ७२ घंट्यांत ९९ टक्के विषाणू नष्ट होत असल्याचे प्रयोगातून स्पष्ट झाले.

३. सध्या ‘सॅनोटाईज’ आस्थापनाने ब्रिटन आणि कॅनडा या देशांत आपत्कालीन प्रकरणात त्याच्या वापरासाठी संमती मागितली आहे. इस्रायल आणि न्यूझीलंड यांनी या स्प्रेला उपचारात आधीच संमती दिली आहे. या आस्थापनाने गेल्या मासामध्ये इस्रायलमध्ये स्प्रेचे उत्पादनही चालू केले आहे. त्या ठिकाणी पुढच्या मासामध्ये ३० अमेरिकी डॉलर (२ सहस्र २५० रुपये) एवढ्या किमतीत एक नेझल स्प्रे बॉटल मिळेल.

४. अमेरिकेतील एल्टिम्यूनने नेझल स्प्रे म्हणून नाकातून दिल्या जाणारी लस विकसित केली आहे. सद्य:स्थितीला हा स्प्रे कोरोना रोखण्यास यशस्वी सिद्ध झाला आहे. त्यातही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये याचा वापर करून संक्रमण रोखले जाऊ शकते, असेही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

५. सॅनोटाईजच्या सीईओ आणि सहसंस्थापिका डॉ. गिली रेगेव यांनी सांगितले की, भारतात स्प्रे उत्पादनासाठी भागीदाराच्या आम्ही शोधात आहेत. भारतात या स्प्रेला ‘मेडिकल डिव्हाइस’ म्हणून संमती मिळण्याची अपेक्षा आहे. यासाठी भारतातील काही मोठ्या औषध आस्थापनांसमवेत चर्चाही चालू आहे; परंतु भारत सरकार किंवा नियामक यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.

भारत बायोटेककडूनही नेझल स्प्रेची चाचणी


भारतात कोव्हॅक्सीन लस बनवणारे भारत बायोटेक हे आस्थापनही नेझल स्प्रे लसीची चाचणी घेत आहे. जानेवारी मासापासूनच ही चाचणी चालू आहे. भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, नेझल स्प्रे लस एकदाच घ्यावी लागेल. यासाठी आस्थापनाने वॉशिंग्टन विद्यापिठासमवेत करार केला आहे.