‘शौर्यजागृती’ या विषयाची संहिता आणि विषय प्रस्तुत करणे, यांविषयी झालेले चिंतन अन् आध्यात्मिक स्तरावर विषय मांडण्याच्या संदर्भात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ज्ञानगुरु आहेत. त्यांनी विविध विषयांवर संपूर्ण समाजासाठी ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली आहे. स्वरक्षण प्रशिक्षण आरंभ होऊन ३ वर्षे उलटत असतांना ‘काळानुसार ज्ञान देणारे श्री गुरु कशा पद्धतीने ज्ञान प्रक्षेपित करून ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्यासारख्या जिवांना अध्यात्माच्या पुढच्या स्तराला घेऊन जात आहेत ?’, याविषयी जाणवलेली काही सूत्रे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

१. शौर्यजागृतीचा विषय प्रस्तुत करतांना आरंभी सिद्ध केलेल्या संहिता आणि त्यात होत गेलेले पालट हे सर्व त्या काळानुसार योग्य असल्याचे अनुभवणे

प्रशिक्षणाचा उपक्रम घेण्याचे ठरल्यावर स्वरक्षण प्रशिक्षण चालू करण्यासाठी प्रारंभी शौर्यजागृती शिबिरे घेण्याचे निश्‍चित झाले. हिंदु युवकांना एकत्रित करून या शिबिरांच्या माध्यमातून वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी मला ‘शौर्यजागृती’ या विषयाची संहिता बनवणे आणि तो विषय प्रस्तुत करणे’, अशी सेवा असायची. ‘त्या संहितेत नंतर कसे पालट होत गेले ?’, हे मला कळलेच नाही. आरंभी केलेली विषयाची निवड, पुढे त्यात होत गेलेले पालट आणि त्याचा सूक्ष्मातील जाणवलेला परिणाम हे सर्व पहाता ‘आरंभी घेतलेले विषय आणि त्यांचा आध्यात्मिक स्तर हे काळानुसार योग्यच होते’, असे माझ्या लक्षात आले. ‘श्री गुरूंनी त्या त्या वेळी ते ते विषय माझ्याकडून निवडून आणि वदवून घेतले’, असे मी अनुभवले.

२. शौर्यजागृतीसाठी निवडलेले विषय आणि त्यांचा आध्यात्मिक स्तर

श्री. सुमित सागवेकर

२ अ. प्राथमिक स्तर – प्रारंभी निवडलेले विषय आणि त्याचा समाजमनावर अल्प काळ झालेला परिणाम पहाता तो विषय मानसिक स्तरावर असल्याचे लक्षात येणे : आरंभी ही संहिता बनवतांना किंवा विषय मांडत असतांना ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे’ यांची उदाहरणे दिली जायची. त्या वेळी समाजातून मिळणारा प्रतिसाद चांगला असूनही तो दीर्घ काळ टिकायचा नाही. तेव्हा ‘तो विषय मानसिक स्तरावर घेतला जात होता’, असे माझ्या लक्षात आले.

२ आ. द्वितीय स्तर – साधना करून क्रांतीकार्य केलेल्या क्रांतीकारकांचा विषय मांडतांना वातावरणात चांगला पालट होणे आणि ‘तो विषय लोकांच्या अंतर्मनापर्यंत पोेचत आहे’, असे जाणवणे : त्यानंतर संहिता बनवतांना देशातील अन्य राष्ट्र्रपुुरुषांची उदाहरणे घेण्याचे ठरवून त्यानुसार प्रयत्न केले. त्या वेळी राष्ट्र्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्यावर एक व्याख्यान घेऊन त्यातून शौर्यजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘ज्यांनी साधना करून क्रांतीकार्य केले होते, त्या क्रांतीकारकांचा विषय मांडतांना वातावरणात चांगला पालट व्हायचा आणि तो विषय समाजाच्या अंतर्मनापर्यंत पोेचायचा, उदा. लोकमान्य टिळक यांच्यावर व्याख्यान घेतांना ‘गीतारहस्य’चे उदाहरण सांगून त्यांचे धर्मरक्षणाचे कार्य, ‘उत्सवातून केलेले हिंदूसंघटन आणि धर्मपरंपरांचे रक्षण’, असा विषय मांडला गेला. त्याचप्रमाणे ‘स्वामी विवेकानंद यांचे धर्मप्रचाराचे कार्य आणि त्यांचा जाज्वल्य धर्माभिमान’, अशी उदाहरणे सांगत असतांना मला वातावरणात चांगला पालट जाणवायचा.

२ इ. तृतीय स्तर – गुरुपौर्णिमेपासून ‘गुरुभक्ती आणि देवावरील श्रद्धा यांच्या बळावर राष्ट्रपुरुषांनी दाखवलेले शौर्य’, असे विषय घेत असतांना पुष्कळ चैतन्य जाणवून ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची स्पंदने अनुभवता येणे : गुरुपौर्णिमेपासून संहितेत आपोआप पालट झाला आणि त्यानंतरची ‘सर्व व्याख्याने आध्यात्मिक स्तरावर होेण्यासाठी देवच दिशा देऊन तसा विचार देत आहे’, याची मला जाणीव झाली. गुरुपौर्णिमेपासून ‘स्वामी विवेकानंदांची गुरुभक्ती, कल्याणस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुभक्ती, मावळ्यांची स्वामीनिष्ठा, त्यांची आई भवानीवर श्रद्धा ठेवून स्वतःला हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित करण्याची वृत्ती’ आदी विषयांवर व्याख्याने घेतली गेली. तेव्हा ‘वातावरण अधिक आध्यात्मिक झाले. या वेळी चैतन्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे त्याचा धर्मप्रेमींवर अधिक परिणाम झाला’, असेे मला जाणवले. बोलतांना माझी कर्तेपणाची भावना आपोआप न्यून झाली आणि ‘भक्तीयुक्त मनाने अन् देवाच्या अनुसंधानात राहून शौर्य जागरणाचा विषय मांडत आहे’, असे मी अनुभवले. त्यामुळे भक्ती आणि शक्ती यांच्या संगमाने निर्माण झालेले ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची स्पंदने मला अनुभवता आली.

३. सर्व शिबिरे ‘ऑनलाईन’ होत असल्यामुळे प्रत्यक्षात धर्मप्रेमी समोर नसणे; मात्र त्यांच्याकडून येणार्‍या स्पंदनांवरून ‘त्यांना कुठला विषय सांगायचा ?’, हे लक्षात येणे

सर्व शिबिरे ‘ऑनलाईन’ होत असल्यामुळे प्रत्यक्षात धर्मप्रेमी समोर नसायचे, तरीही ‘त्यांच्याकडून येणार्‍या स्पंदनांवरून देव त्यांच्या मानसिकतेची जाणीव करून देतो’, असे माझ्या लक्षात आले. समूह मानसिकता प्रत्यक्ष स्थुलातून अथवा समूहाशी संवाद साधल्यावर चालू होते. या सर्व ‘ऑनलाईन’ व्याख्यानांमध्ये कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्याकडून मनोगत व्यक्त केले जाते. तेव्हा आधी कुणी काहीच बोलत नाही; पण ‘त्यांना नेमके काय सांगायला हवे ?’, याची देव मला जाणीव करून देतो आणि तसे माझ्याकडून वदवूनही घेतो.

यातून ‘देवाला आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जायचे आहे’, असे मला जाणवले. ‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.

४. विषय मांडल्यावर होणार्‍या परिणामांवरून ‘व्याख्यानाचा स्तर कसा ओळखायचा ?’, याविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

४ अ. व्याख्यान मानसिक स्तरावर असेल, तर लोकांना विषय आवडणे; परंतु ते कृतीप्रवण न होणे : आधी मला ‘आध्यात्मिक स्तरावर विषय मांडता येत आहे का ?’ हे कळायचे नाही. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेल्या एका सूत्राचे मला सतत स्मरण होते. त्या म्हणाल्या, ‘‘विषय मांडत असतांना आपल्याकडून तो विषय पोटतिडकीने मांडला जात आहे का ?’, याला महत्त्व असते. तो विषय आतून आला पाहिजे. व्याख्यान किंवा विषय झाल्यावर लोक येऊन सांगतात, ‘विषय चांगला झाला’; मात्र नंतर कृती करणारे अत्यल्प असतात. तेव्हा ‘तो विषय मानसिक स्तरावर झाला’, असे समजावे.

४ आ. व्याख्यान आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे चैतन्याच्या स्तरावर असेल, तर तो विषय लोकांच्या अंतर्मनापर्यंत जाऊन ते कृतीप्रवण होत असणे : आपला विषय आध्यात्मिक स्तरावर होत असेल, तर येणारा प्रतिसाद किंवा ऐकणार्‍यांच्या मनामध्ये ‘मी धर्मासाठी काय कृती करू ?’, हा विचार असतो. एखादे संत विषय मांडत असतांना असे होते. एखाद्या साधकाने तळमळीने देवाला शरण जाऊन विषयाशी एकरूप होऊन विषय मांडला, तर तोही चैतन्याच्या स्तरावर होतो. असा विषय मांडल्यासच त्याचा समाजावर परिणाम होतो. अन्यथा तो विषय लोकांच्या आतपर्यंत जातच नाही. हे लक्षात घेऊन स्वतःचे साधनेचे प्रयत्न वाढवून स्वतःतील चैतन्य वाढवण्यासाठी प्रयत्न कर.’’ तेव्हापासून विषय मांडत असतांना या वाक्याची आठवण होऊन प्रत्येक वेळी देवच माझ्याकडून त्या विषयाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करवून घेतो. देवतांच्या उदाहरणांचा अधिकाधिक उपयोग केल्याने तो विषय आध्यात्मिक स्तरावर आणि चैतन्यदायी होण्यास साहाय्य होते.’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (८.१०.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक