‘एकदा सत्संगात कु. वेदिका खातू यांनी विचारलेल्या प्रश्नांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.

१. मनाला त्रास देणारा प्रसंग मनातून पूर्ण जाईपर्यंत स्वयंसूचना देणे आणि त्या समवेत नामजपही करणे

कु. वेदिका खातू : मध्यंतरी माझा दोन प्रसंगांत संघर्ष झाला. मी त्यासाठी स्वयंसूचनाही घेतल्या. उत्तरदायी साधकाशी बोलूनही घेतले; पण ते प्रसंग माझ्या मनातून जात नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपल्या संदर्भात काहीतरी प्रसंग घडतो. आपण त्यासाठी स्वयंसूचना दिल्यावरही तो प्रसंग मनातून जात नाही. काही प्रसंग असे असतात की, त्यासाठी कित्येक मास स्वयंसूचना द्याव्या लागतात; कारण तो प्रसंग आपल्या मनाने घट्ट धरलेला असतो आणि काही प्रसंगांत एक दिवस सूचना दिली, तरी आपण त्यातून बाहेर येतो. ‘तो प्रसंग किती दिवसांनी माझ्या मनातून जाईल’, याची अपेक्षा करायची नाही. तो मनातून पूर्ण जाईपर्यंत स्वयंसूचना देत रहायचे. त्याच वेळी याच्या जोडीला दिवसाला अधिकाधिक नामजपही व्हायला पाहिजे.
२. प्रारब्धाकडे दुर्लक्ष न करता योग्य नामजपाच्या साहाय्याने त्याच्याशी लढणे आवश्यक
कु. वेदिका खातू : मला त्रासदायक वाटणारा प्रसंग स्वीकारला, तर ‘ते माझे प्रारब्ध आहे’, असे समजून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून नामजप करायचा का ?’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘प्रारब्धाकडे दुर्लक्ष करायचे नाही. त्याच्याशी योग्य नामजप करून लढायचे आहे’, हे लक्षात ठेवा.’
– कु. वेदिका खातू, सनातन आश्रम, रामनाथी गोवा.