आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्याकडून शिक्षक स्थानांतर प्रक्रियेत ३९ कोटी रुपयांचा घोटाळा ! – बाळासाहेब सानप, ओबीसी नेते

बीड – जिल्ह्यात वर्ष २०१४ मध्ये जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा स्थानांतरमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांनी ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला. बीड येथे १३ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या आमदार सौ. पंकजा मुंडे मंत्री असतांना हा घोटाळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब सानप म्हणाले की, १४ वर्षांनंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावली प्रश्न उद्भवला आहे. ज्या वेळी आंतरजिल्हा स्थानांतर चालू होते, त्या काळात वर्ष २०१४ मध्ये सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्या वेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि संदीप क्षीरसागर हे त्या वेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्या काळात ही सर्व भरती झाली आहे. त्या काळात प्रत्येक जणाकडून ३ लाख रुपये घेण्यात आले. १ सहस्र ३०० लोकांचे ३ लाख रुपये म्हणजेच एकूण जवळपास ३९ कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

या प्रकारामुळे सुरेश धस, सय्यद अब्दुल्ला, संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे.