रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडी यागाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि झालेला अभ्यास !

१४.५.२०२३ आणि १५.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग झाले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि माझा झालेला अभ्यास येथे दिला आहे.

छायाचित्र १

१. ‘पहिल्या दिवशी (१४.५.२०२३) आरंभी याग चालू असतांना माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार येत होते. त्यामुळे मला काही सुचत नव्हते.

कु. म्रिणालिनी देवघरे

२. शक्तीची स्पंदने जाणवणे

दुसर्‍या दिवशी (१५.५.२०२३) आरंभापासून मला शक्तीची स्पंदने जाणवत होती. ‘आरंभी शक्तीची स्पंदने माझ्या सहस्रारचक्रापासून हळूहळू आज्ञाचक्रापर्यंत आली. त्यानंतर ती गालापर्यंत पोचली’, असे मला जाणवले. ‘आदल्या दिवशीपेक्षा दुसर्‍या दिवशी शक्तीची स्पंदने वाढली आहेत’, असे मला जाणवले. थोड्या वेळाने मला आज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवली.

३. एक युद्धभूमी दिसून तिथे देवीचे युद्ध चालू आहे’, असे दृश्य डोळ्यांसमोर येणे

आठवा अध्याय चालू असतांना आहुतीसाठी मंत्र म्हणत असतांना माझ्या डोळ्यांसमोर ‘एक युद्धभूमी दिसली आणि तिथे देवीचे युद्ध चालू आहे’, असे दृश्य डोळ्यांसमोर आले. ‘देवी सिंहावर आरूढ झाली आहे आणि देवीचे मारक रूप आहे’, असे दिसत होते.’ त्या वेळी मला एक चित्र सुचले आणि पुढील सूत्रे जाणवली. (छायाचित्र १ पहा)

अ. चित्र काढतांना माझ्यावरचे अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट होत आहे.

आ. चित्रात काढलेली आकृती लाल रंगात दिसली.

इ. चित्रातील आकृती देवीचे यंत्र आहे.

ई. चित्रातून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.

४. दहावा अध्याय चालू असतांना मला शक्तीची स्पंदने जाणवली आणि १ चित्र सुचले. (छायाचित्र २ पहा)

छायाचित्र २

५. देवीने ‘अकरावा अध्याय चालू आहे’, असे सांगणे

अध्याय चालू होण्यापूर्वी माझे ध्यान लागले आणि थोड्या वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर मला ‘कोणता अध्याय चालू आहे ?’, हे कळले नाही. त्या वेळी माझे डोळे बंद झाले आिण मला एक देवी दिसली अन् तिने स्मितहास्य केले. तिने मला सांगितले, ‘हा अकरावा अध्याय चालू आहे.’ तेव्हा ‘हा क्षण जणू काही प्रत्यक्ष घडला आहे’, असे मला वाटले; पण तो सूक्ष्मातून घडला आहे, हे मला नंतर कळले.

६. अग्नीत देवतातत्त्व जागृत असल्याचे जाणवणे

छायाचित्र ३

‘पूर्णाहुती चालू असतांना केवळ अग्नीकडेच बघत रहावे’, असे मला वाटत होते. अग्नीकडे पाहिल्यावर मला भाव जाणवत होता. ‘अग्नीत देवतातत्त्व जागृत झाले आहे’, असे मला वाटत होते.’ (छायाचित्र ३ पहा)

– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.५.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक