सांगोल्डा येथे बंगल्यात क्रिकेट सट्टेबाजी : ३ जणांना अटक

म्हापसा, १३ एप्रिल (वार्ता.) – सध्या ‘टाटा इंडियन प्रिमीयर लीग’ ही क्रिकेट स्पर्धा चालू असून यातील सामन्यांवर राज्यात मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आहे. गोवा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आतापर्यंत यातील दलाल आणि सट्टेबाजी करणारे यांच्या विरोधात धडक मोहीम उघडली आहे. याच अनुषंगाने साळगाव पोलिसांनी सांगोल्डा येथील एका बंगल्यावर धाड घातली. तेथे ‘टाटा इंडियन प्रिमीयर लीग’ क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा घेणार्‍या ३ सट्टेबाजांना अटक केली.

पोलिसांनी परराज्यांतील ३ जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून १ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि अन्य साहित्य मिळून १ लाख २० सहस्र रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.