
नागपूर – उमेरड ‘एम्.आय.डी.सी.’मधील एम्.एम्.पी. आस्थापनात ११ एप्रिल या दिवशी झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आस्थापनाकडून ५५ लाख आणि शासनाकडून ५ लाख रुपये अशी एकूण ६० लाख रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. घायाळ कामगारांना आस्थापनाकडून ३० लाख रुपये मिळतील. त्यांच्यावर शासनाच्या वतीने विनामूल्य उपचार केले जातील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या दुर्घटनेत पियुष दुर्गे, सचिन मसराम, निखिल शेंडे, अभिलाष जंजाळ आणि निखिल नेहारे यांचा मृत्यू झाला आहे. मनीष वाघ, करण शेंडे, नवनीत कुमरे, पियुष टेकाम, करण बावणे आणि कमलेश ठाकरे हे गंभीर घायाळ झाले आहेत. सर्व मृतक आणि घायाळ कामगार उमरेड अन् भिवापूर तालुक्यांतील आहेत.

घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घटनास्थळाची पहाणी केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मृतक आणि घायाळ कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आस्थापनात नोकरी देण्यात येणार आहे. शासन कामगार कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.