भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारा ज्ञानकुल संस्थेचा ‘ज्ञानोत्सव’ पार पडला !

मुंबई – शालेय अभ्यासक्रमासमवेत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, विविध कला आणि साहित्य यांचे शिक्षण देणार्‍या ज्ञानकुल संस्थेचा ३ दिवसांचा ज्ञानोत्सव चेंबूरमधील बाल विकास संघ येथे १० ते १२ एप्रिल या कालावधीत पार पडला. ‘अखंड भारत’ या संकल्पनेच्या अंतर्गत एकात्मता स्तोत्रावर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले प्रकल्प मांडले होते. त्यांची माहितीही विद्यार्थी उत्साहाने देत होते.

या प्रदर्शनातून अखंड भारतातील विविध उपखंडांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवण्यात आले. भारताच्या इतिहासातील उल्लेखनीय घटनांचे चित्रणही या प्रदर्शनातून करण्यात आले होते. भारतातील राजे-महाराजे, साधू-संत, क्रांतीकारक, वीरांगना, प्राचीन ग्रंथ साहित्य यांविषयीची सचित्र माहिती याठिकाणी मांडण्यात आली होती. पुरातन चलने, नाणी, शिवकालीन अस्त्र-शस्त्र प्रदर्शनात मांडण्यात आले होते. अखंड भारतातील प्रसिद्ध नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे, शक्तीपीठे, ऐतिहासिक कला आणि साहित्य यांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सिद्ध केले होते. त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली होती. ऐतिहासिक ज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेली कोडी प्रदर्शन पहाणार्‍यांचे कुतूहल वाढवत होती.

या वेळी ज्ञानकुलच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके, भजने आणि शौर्यगीते सादर केली. बिल्लाबोंग इंटरनॅशनल शाळेचे अध्यक्ष श्री. सुधीर गोयंका, ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष श्री. आमोद उसापकर, चेंबूरचे प्रसिद्ध सी.ए. तेगचंद गुप्ता आणि भारत विकास परिषदेचे प्रचारक श्री. क्षितिज गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेतील भीष्म पितामह यांची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना आणि इंडियन एक्सप्रेस अन् ‘माय उडान ट्रस्ट’च्या संचालिका अनन्या गोयंका यांनी या प्रदर्शनाला आवर्जून उपस्थिती नोंदवली. अन्य शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक, इतिहासप्रेमी, संशोधनप्रेमी, तसेच शेकडो नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.