
नागपूर – येथील मानेवाडा रोड लाडीकर लेआउटमध्ये रहाणार्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागातील साहाय्यक प्राध्यापिका डॉ. अर्चना राहुले (वय ५० वर्षे) यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. १२ एप्रिलच्या रात्री त्यांचे पती डॉ. अनिल राहुले सुट्टीसाठी रायपूरहून घरी आले असता ही घटना उघड झाली. डॉ. अर्चना एकट्याच घरी रहात होत्या. त्यांचे पती रायपूर येथे असतात, तर मुलगा पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात ही हत्या शत्रुत्वातून कि दरोड्याच्या उद्देशाने झाली, याचा शोध घेतला जात आहे. घरातून काही मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत का ? याचेही अन्वेषण चालू आहे. पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी डोक्यावरील जखमा लक्षात घेता त्यांचा खून करण्यात आला असण्याची शक्यता अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.