हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करू नये ! – अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

सातारा, १३ एप्रिल (वार्ता.) – देशातील हिंदु मंदिरे ही हिंदु धर्मियांच्या आस्थेची प्रतीके आहेत; मात्र महाराष्ट्रात हिंदु धर्मियांच्या प्रसिद्ध मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सरकारचा हस्तक्षेप अधिक आहे. अशा मंदिरांना हिंदु धर्मियांच्या स्वाधीन करून त्यांच्या श्रद्धेला मुक्त वाव द्यावा आणि मंदिरांचे सरकारीकरण थांबवावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी केली. अयोध्या येथे विश्व हिंदु परिषदेच्या केंद्रीय संघटन बैठकीत आलोक कुमार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ‘संत सेवा यात्रे’चा प्रारंभ केला. नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील दौर्‍यानंतर सांगलीतून ते सातारा येथे आले होते.

अधिवक्ता आलोक कुमार पुढे म्हणाले की, विश्व हिंदु परिषदेच्या ‘संत सेवा यात्रे’च्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये हिंदु समाजाचे संघटन आणि सशक्तीकरण या प्रक्रिया महत्त्वपूर्ण पद्धतीने राबवल्या जात आहेत. संत सेवा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत, महंत, मठाधिपती यांच्या गाठीभेटी घेऊन हिंदु धर्मियांच्या अस्मिता जोपासणे, हिंदूसंघटन वाढवणे, हिंदु धर्माचा प्रसार-प्रचार करणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मंदिरे चालवली जातात, तेथे कोणतेही अधिकार मठाधिपती अथवा पुजार्‍यांना दिले जात नाहीत. ज्या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सरकारी अधिकार्‍यांचा हस्तक्षेप असतो, ती मंदिरे हिंदु धर्मियांच्या स्वाधीन करावीत, अशी आमची मागणी आहे. यात्रेचा समारोप पुणे येथे एका मोठ्या कार्यक्रमामध्ये होणार आहे.