देशभरात एकूण ५०० ठिकाणी झाले सामूहिक ‘गदापूजन’

सिंधुदुर्ग – अयोध्येत स्थापन झालेले श्रीराममंदिर हा एक प्रकारे रामराज्याचा प्रारंभ असून आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे आणि हिंदु समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी १२ एप्रिल या दिवशी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् भाविक यांच्या सहभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ठिकाणी, तर देशभरात एकूण ५०० ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.
या कार्यक्रमांचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहे आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ अन् भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमांत २५० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.