पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ

नवी देहली – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे. यात अनेक पाकिस्तानी हिंदूंच्या प्रतिक्रिया असून अशा प्रकारच्या शिकवणीमुळे ते सहकारी आणि सह विद्यार्थी यांच्याकडून अपमान सहन करत आहेत, असे यात सांगण्यात आले आहे.

१. पाकमध्ये पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून लहान वयातच मुलांना ‘हिंदू हे ‘काफिर’ आहेत’, असे शिकवले जाते. त्यांच्यात हिंदूंविषयी द्वेष निर्माण केला जातो. ‘पाकमधील अनेक अयोग्य गोष्टींना हिंदू उत्तरदायी आहेत’, असे सांगितले जाते.

२. राजेश या हिंदूने सांगितले की, या पुस्तकांमध्ये ‘काफिर’ या शब्दाचा अर्थ ‘मूर्तीपूजा करणारे आणि महिलांचा द्वेष करणारे’, असे म्हटले आहे. ‘मुलगी जन्माला आली, तर हिंदू त्या बाळाला जिवंत पुरतात’, असेही यात म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

३. डॉ. कुमार नावाच्या हिंदु व्यक्तीने माहिती दिली की, सिंध टेक्स्ट बूक बोर्डाच्या ११ आणि १२ वीच्या पुस्तकात हिंदू अन् शीख यांचे वर्णन करतांना ‘मानवतेचे शत्रू’ असे म्हटले आहे. हिंदू आणि शीख यांनी सहस्रो महिला, पुरुष अन् मुले यांची हत्या केली, असा दावाही यात करण्यात आला आहे.

४. या पुस्तकातून मुसलमानांमध्ये असे चित्र निर्माण केले जाते की, हिंदू देशद्रोही असून त्यांच्यात पाकिस्तानविषयी देशभक्तीची भावना नाही.

५. ९ वी आणि १० वीच्या पुस्तकांमध्ये हिंदूंना ‘विश्‍वासघातकी आणि फसवणूक करणारे’, असे म्हटले आहे. ब्रिटिशांशी लढण्यासाठी हिंदु आणि मुसलमान एकत्र आले; मात्र हिंदूंनी मुसलमानांप्रती शत्रूत्व दाखवल्याने त्यांच्यात फार काळ एकी राहिली नाही, असे म्हटल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.

६. पाकमधील शिक्षणतज्ञ ए.एच्. नय्यर यांनी सांगितले की, पाकमधील पुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यात आला आहे. पाकमध्ये जेव्हा इतिहास शिकवला जातो, तेव्हा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यातील लढाईला मुसलमान आणि हिंदू यांच्यातील युद्ध असे स्वरूप दिले जाते. पाकच्या स्थापनेला योग्य ठरवण्यासाठी अशा पुस्तकामध्ये हिंदूंना खलनायक रूपात दाखवले जाते.

७. नय्यर यांनी सांगितले की, या पुस्तकामध्ये मुसलमान शासकांची माहिती आहे; मात्र हिंदूंचा इतिहास नाही. मुसलमानांच्या पूर्वी येथे हिंदू शासक होते, याचा यात कोणताही उल्लेख नाही.