‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी कुटुंबियांची काळजी घेतात’, अशी अनुभूती घेणार्‍या तळेगाव येथील आधुनिक वैद्या (सौ.) कृपा श्रेय टोंपे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पती पावसाळ्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावरून जातांना प.पू. गुरुमाऊलीने त्यांचे रक्षण करणे

आधुनिक वैद्या (सौ.) कृपा टोंपे

१ अ. पावसाळ्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावरून जातांना धोका असणे आणि पती एकटेच तेथून जाणार असल्याने भीती वाटणे : ‘दळणवळण बंदीच्या काळात मी आणि माझे पती डॉ. श्रेय तळेगाव येथील आमच्या रहात्या घरापासून प्रतिदिन टाकवे बु. (तालुका मावळ) येथील चिकित्सालयात रुग्ण तपासणीसाठी जायचो. या मार्गावर इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावरून जावे लागते. (हा पूल ब्रिटीशकालीन असून त्याच्या बांधकामाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.) पावसाळ्यात इंद्रायणी नदी तुडूंब भरून वाहू लागल्यावर कधी कधी पुलावरही पाणी येते. ९.७.२०२० या दिवशी मी चिकित्सालयात जाणार नव्हते. श्री. श्रेय एकटेच जाणार होते. त्या वेळी नदीचे पाणी पुलाच्या काठापर्यंत आले असल्याने मला सकाळपासूनच त्यांची पुष्कळ काळजी वाटत होती.

१ आ. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून जसे भक्तांचे रक्षण केले, तसे सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊली नदीवरील पूल उचलून पतीचे रक्षण करत असल्याचे जाणवणे आणि काळजी दूर होणे : या वेळी अकस्मात् माझ्या डोळ्यांसमोर प.पू. गुरुमाऊली आमच्या चारचाकी वाहनाच्या चालकाच्या (माझ्या पतीच्या) शेजारील आसंदीवर बसली असल्याचे मला दिसले आणि ते मला ‘तू काळजी करू नकोस’, असे म्हणाले. नंतर माझे पती घरून निघाल्यावर ‘प.पू. गुरुदेवांनी नदीवर असलेला पूल दोन्ही हातांवर अलगद धरला आहे’, असे दृश्य मला दिसले. त्यांचे ‘मी आहे. तू काळजी करू नकोस’, असे शब्द पुन्हा मला ऐकू आले. त्या क्षणापासूनच माझी भीती आणि काळजी दूर झाली. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून जसे भक्तांचे रक्षण केले, तसे प.पू. गुरुदेवांनी पतीचे रक्षण केल्याचे मला जाणवून माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. अशी अनुभूती मला या मासात २ – ३ वेळा आली.

२. प.पू. गुरुमाऊलीने मुलाच्या स्वप्नात येऊन आशीर्वाद देणे आणि मुलगा स्वप्नाविषयी सांगत असतांना भावजागृती होणे

याच दिवशी माझा मोठा मुलगा नलिन (वय ९ वर्षे) देवपूजा करत असतांना मला म्हणाला, ‘‘काल मला स्वप्नात दिसले, ‘प.पू. गुरुमाऊली घरी आले आहेत. ते घरात सर्वत्र फिरले. ते आपल्या सर्वांना पहात होते. त्या वेळी आपण सगळ्यांनी त्यांची पाद्यपूजा केली. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा परत जात असतांना आपण सगळे पुष्कळ रडलो.’’ तो या स्वप्नाविषयी सांगत असतांना आम्हा दोघांनाही प.पू. गुरुदेवांनी ‘ते स्वतः आमच्या समवेत असल्याची प्रचीती दिली’, असे वाटून माझी पुन्हा भावजागृती झाली आणि प.पू. गुरुमाऊलींच्या प्रती माझा पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला.’

– आधुनिक वैद्या (सौ.) कृपा श्रेय टोंपे, तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे. (२२.७.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक