११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – ११ एप्रिल या दिवशी होणार्‍या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर राज्यातील दळणवळण बंदीचा निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. राज्यात दळणवळण बंदीविषयीचे निर्बंध कडक करण्याविषयी १० एप्रिल या दिवशी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित सर्वांनी दळवळणबंदीचे निर्बंध कडक करण्याला सहमती दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित सर्वांची मते समजून घेतली.

सायंकाळी ५ वाजता चालू झालेली ही बैठक सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दळणवळण बंदी कडक करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून दळणवळण बंदीविषयी विस्तृत आराखडा सिद्ध करून उद्याच्या बैठकीनंतर याविषयी धोरण घोषित करू, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी म्हटले.