डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल गोमंतक हिंदू संघटनेकडून मडगाव नगरपालिकेजवळ निदर्शने

मडगाव नगरपालिकेजवळ महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेले गोव्याच्या विविध भागांतील हिंदू

मडगाव, ९ एप्रिल (वार्ता.) –हिंदुत्वासाठी लढणारे गाझियाबादच्या डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती स्वामी महाराजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गोव्यातील अखिल गोमंतकीय हिंदू संघटनेकडून मडगाव नगरपालिकेजवळ ९ एप्रिलला सायंकाळी आंदोलन करण्यात आले.

या वेळी संघटनेचे कार्यकर्ते श्री. जयेश नाईक म्हणाले, ‘‘सनातन हिंदु धर्माची परिभाषा सत्यावर आधारित आहे. सत्याचा विजय करण्यासाठी धर्म नेहमीच पुढे राहिला आहे. जेव्हा जेव्हा धर्माला दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंताने अवतार घेतला आहे. आज विविध ठिकाणचे हिंदू येथे एकत्र आलेले आहेत. ज्या देशविघातक शक्ती आहेत, जे भारताच्या विरोधात असलेले देशद्रोही आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, जर यति नरसिंहानंद सरस्वती स्वामी महाराजांना काही झाले, तर आम्ही गप्प बसणार नाही. संपूर्ण गोव्यातून अशा देशद्रोह्यांना पळवून लावू. जर साध्या भाषेत त्यांना समजत नसेल, तर आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल. नंतर हिंदूंना दोष देऊ नये. हिंदू जेव्हा जागृत होतील तेव्हा इतिहास घडेल, हे लक्षात ठेवा.’’ या वेळी शिवसेनेचे माजी गोवा प्रमुख श्री. रमेश नाईक म्हणाले, ‘‘हिंदूंनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्या वेळी शंकराच्या पिंडीला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ केला. आम्हाला पुढे पावलोपावली रक्त सांडावे लागले, तर त्यासाठी आमची सिद्धता आहे. ज्यांना वाटत असेल की, येथे दुसरा पाकिस्तान निर्माण करू शकू, त्यांनी पाकिस्तानात जावे.’’

धर्मांधांकडून वक्त्यांच्या भाषणाचे चित्रीकरण करून वाद घालण्याचा प्रयत्न

आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. जयेश थळी महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या समर्थनार्थ त्यांचे विचार मांडत असतांना २ धर्मांध युवक जे या आंदोलनाचे भ्रमणभाषवर ध्वनीचित्रीकरण करत होते, ते वक्त्यांशी वाद घालू लागले. प्रारंभी ते एखाद्या दैनिकाचे वार्तांकन करत आहेत, असे वाटत होते; पण ते पत्रकार नसल्याचे नंतर समजले. त्या दोन्ही युवकांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली.

(धर्मांध एवढ्या संख्येने जमलेल्या हिंदूंसमोर येऊन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात, यावरून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ! हिंदूंनीही यापुढे आंदोलन करतांना सतर्कता बाळगायला हवी, हे यातून दिसून येते ! – संपादक)