एकदा जगद्गुरु शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला की, देवाला नैवेद्य का दाखवायचा ? आम्ही जो नैवेद्य दाखवतो, त्यातील काहीही देव खात नाही, ना त्या पदार्थात कुठला पालट होतो, मग नैवेद्य कशासाठी ? नैवेद्य हे थोतांड नाही का ?
शंकराचार्य जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, ‘‘जेव्हा कुणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो, तेव्हा रस्त्यात कुणी भेटला, तर त्याला तो काय सांगतो ? हे पेढे माझे आहेत, मी देवासाठी आणले आहेत; पण तेच पेढे जेव्हा तू नैवेद्य दाखवून आणतोस, तेव्हा तुला कुणी विचारले, तर तू काय सांगतोस ? हा देवाचा प्रसाद आहे, हा रामाचा अथवा हनुमानाचा प्रसाद आहे. हे माझे नाही, तर परमेश्वराचे आहे, ही भावना मनात रुजू होते. हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या प्रसादाने तुझ्यातील मी बाहेर फेकला गेला. परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’
म्हणूनच सणासुदीला नेहमी घरात काहीही गोड केले किंवा अन्य दिवशी देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा हिंदु संस्कृतीत आहे. देवाची आठवण प्रत्येक प्रसंगी असावी, हा एक उद्देश तर आहेच; पण ‘मी’पणा नाश पावावा, हाही उद्देश आहेच.
(संदर्भ : व्हॉटस्अॅप)