प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, कर्तव्यदक्ष आणि गुरुदेवांप्रती अव्यक्त भाव असलेल्या देवद आश्रमातील सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

फाल्गुन कृण पक्ष सप्तमी (३.४.२०२१) या दिवशी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे पती आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी आणि मुलगी कु. रेणुका कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. मीरा कुलकर्णी

सौ. मीरा कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी (यजमान), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. उत्साही

१. सौ. मीरा सणवाराला किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य करायचे असेल, तेव्हा कधीही कंटाळा न करता पहाटे उठून घरातील आवराआवर, स्नान इत्यादी करून स्वयंपाकाला आरंभ करते.

२. आश्रमातही साधकांच्या अल्पाहाराची सेवा या वयातही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने पहाटे ४.३० वाजता उठून उत्साहाने करते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनीही सांगितले, ‘‘अल्पाहाराच्या सेवेतील तिची एकाग्रता आणि सेवा करतांनाच्या लयबद्ध हालचाली पाहून पहाणार्‍याचा भाव जागृत होतो.’’

१ आ. पाककलानिपुण : ती पाककलानिपुण आहे. त्यामुळे वेळ पडल्यास आश्रमाच्या स्वयंपाकघरातील साधकही तिचे साहाय्य घेतात.

१ इ. सातत्य, चिकाटी आणि सवलत न घेणे : मागील २४ वर्षांपासून ती सेवा करतेे. ‘इतक्या वर्षांत तिने सेवेत कधी सवलत घेतली’, असेे मी पाहिले नाही. विश्रांतीची वेळ असली आणि सेवा असेल, तर ती सेवा पूर्ण करण्यालाच प्राधान्य देते. हे सर्व ती २४ वर्षे अविरतपणे करत आहे. तिच्यातील सातत्य आणि चिकाटी तसूभरही अल्प झालेली नाही.

१ ई. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : पूर्वी आश्रमजीवनाशी जमवून घेता न आल्यामुळे ती घरी गेली होती. माझ्या आईचे निधन झाल्यावर ती पुन्हा आश्रमात रहायला आली. तेव्हा ‘तिला आश्रमजीवन जड जाईल’, असे मला वाटले होते; परंतु तिने ते मनापासून स्वीकारले. आता तिची स्वयंपाकघरातील साधक आणि तिच्या सेवेतील सहसाधक यांच्याशी चांगली जवळीक झाली आहे. आता साधकांनाही तिच्याविषयी आत्मीयता वाटते.

१ उ. कर्तव्यदक्ष

१ उ १. घराचे दायित्व आनंदाने सांभाळणे

अ. सौ. मीरामुळेच मी साधनेत आलो. मी साधनेत आल्यानंतर माझ्याकडे काही महत्त्वाच्या सेवा होत्या. तेव्हा तिने घराचे दायित्व सांभाळतांना कधीही गार्‍हाणे केले नाही, उलट मला सतत प्रोत्साहनच दिले. तिने घर सांभाळून रेणुकाला लहानाचे मोठे केले.

आ. वर्ष १९९९ पासून मी आधी प्रसाराच्या निमित्ताने आणि नंतर देवद आश्रमात रहात असल्याने घरी फार नसायचो; परंतु अधिकोष आणि सरकारी कार्यालय येथील कामे तिने दायित्वाने सांभाळली. या तिच्यातील गुणांमुळेच मी वर्ष १९९९ पासून घराबाहेर राहून गुरुकार्यात सहभागी होऊ शकलो.

इ. मी चाकरीचा त्याग केल्यानंतर काही दिवसांनी मला उत्तर भारतात प्रसारासाठी जाण्याविषयी विचारले, तेव्हा मी लगेचच ‘हो’ म्हटले. तेव्हा माझी मुलगी कु. रेणुका केवळ ६ वर्षांची होती. सौ. मीराला ‘मी जाऊ का ?’, असे विचारायची मला आवश्यकताही भासली नाही; कारण ‘ती होकारच देणार’, याची मला निश्‍चिती होती.

ई. पूर्वी मी आश्रमात रहात असतांना कधीतरी घरी जात असे. मी घरी गेल्यावर तिला ‘एक पत्नी आणि गृहिणी या नात्याने आवश्यक ती सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडता यावी’, यासाठी ती तिच्याकडे असलेल्या सर्व सेवा मी घरी जायच्या आधी पूर्ण करून ठेवत असे.

उ. माझी आई निधनापूर्वी ६ मास सर्वांगाच्या पक्षाघाताने रुग्णाईत होती. त्यामुळे तिला स्वतःचे काहीच करता येत नव्हते. तिला लघवी आणि जेवण यांसाठीही नळी लावली होती. तिला दिवसांतून ५ – ६ वेळा नळीतून पातळ पदार्थ करून घालणे आणि तिची शारीरिक स्वच्छता करणे यांसारख्या सेवा तिने मनापासून केल्या.

१ ऊ. कुठलेही कर्म परिपूर्ण करणे

१. घर आवरणे, स्वयंपाक, अहवालाची सेवा, पाहुण्यांचे आदरातिथ्य, असे कुठलेेही कर्म असो, सौ. मीरा ते अत्यंत भक्तीभावाने करते. उगाचच काहीतरी केले आणि उरकून टाकले, असे तिचे कधीच नसते.

२. घरी असतांनाही ती अहवालातील हिशोब पूर्ण होईपर्यंत रात्री कितीही जागायला लागले, तरी ते पूर्ण करूनच झोपत असे.

३. सद्गुरु राजेंद्रदादांनी ते आढावा घेत असलेल्या एका गटाच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे दायित्व तिच्याकडे सोपवले होते. ते तिने उत्तम प्रकारे पार पाडले.

१ ए. भाववृद्धीचे प्रयत्न वाढणे : पूर्वी ती बुद्धीने विचार करून नकारात्मक होत असे. मागील २ वर्षांपासून तिने सद्गुरु राजेंद्रदादांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याचा पुरेपूर लाभ करून घेतला आहे. त्यामुळे ती दिवसेंदिवस सकारात्मक होत आहे. तिचे भाववृद्धीचे प्रयत्नही चांगले होत आहेत. परिणामी साधनेतही ती पुढेपुढे जात असल्याचे जाणवते. तिचे भावप्रयोग सद्गुरु राजेंद्रदादांनाही आवडतात.’

२. कु. रेणुका कुलकर्णी (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. वर्ष १९९६ मध्ये सनातन संस्थेशी संपर्क होऊन साधनेचा आरंभ होणे आणि लगेचच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे : ‘माझी आई सौ. मीरा कुलकर्णी हिने वनस्पतीशास्त्रात ‘एम्.एस्.सी.’ ही पदवी घेतली आहे. ती ‘स्टेट बँके’त नोकरी करत होती. तेव्हा तेथे सनातनचे साधक आणि दंतवैद्य असलेल्या दातेकाकांनी सत्संग घेतला. सत्संग ऐकून ती प्रभावित झाली. तिने माझ्या बाबांनाही (आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी यांनाही) सत्संगाविषयी सांगितले. मग बाबाही सत्संगाला जाऊ लागले. साधना कळल्यावर आईने नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. बाबांनीही एका संतांना ‘मला पूर्णवेळ साधना करायची इच्छा होत आहे’, असे स्वतःहून सांगून लगेच नोकरी सोडली. तेव्हा सनातनचे कार्य फारसे मोठे नव्हते, तरी केवळ श्री गुरूंवर असलेल्या श्रद्धेमुळे त्यांनी हा निर्णय लगेच आणि सहजतेने घेतला.

२ आ. कर्तव्यपरायणता

२ आ १. वडिलांच्या अनुपस्थितीत घराचे सर्व दायित्व समर्थपणे सांभाळणे : माझे बाबा बरीच वर्षे प्रसारात होते. घरी मी आणि आई दोघीच असायचो. मला शाळेतून आणणे-पोचवणे, माझा अभ्यास घेणे, चुकांविरहित सेवा पूर्ण करणे, स्वयंपाक आदी सर्वच कामे तिने समर्थपणे पूर्ण केली. माझा अभ्यास घेऊन त्यानंतर रात्री २ पर्यंत जागून अहवालांची सेवा पूर्ण करणारी आणि पहाटे ५ वाजता उठून घरातील कामे करणारी आई माझ्यासाठी आदर्श आहे.

२ आ २. आजी-आजोबांनी साधनेसाठी केलेला विरोध विसरून रुग्णाईत झालेल्या आजीची सेवा-सुश्रुषा करणे : माझ्या आजी-आजोबांचा साधनेला तीव्र विरोध होता. ते अन्य ठिकाणी रहात असल्याने मधली अनेक वर्षे आमचा आजी-आजोबांशी संपर्कही नव्हता. ते आई-बाबांशी बोलतही नव्हते. नंतर शारीरिक अडचणींमुळे आजी-आजोबा आमच्या घरीच रहायला आले. आजीचे शेवटचे दिवस फार कष्टात गेले. तिची शुद्ध हरपायची. ती कित्येक दिवस अंथरूणाला खिळून होती. तेव्हा आईने तिच्या मनातील पूर्वग्रह बाजूला ठेवून आजीची मनापासून सेवा केली. आई-बाबा दोघांनीही आजीला अंघोळ घालणे, तिचा ‘डायपर’ पालटणे आदी सेवा मनापासून केल्या. आईने मनात राग न ठेवता तिची मनोभावे सेवा करून ईश्‍वराचे मन जिंकले.

२ इ. इतरांचा विचार करणे

१. पुणे येथे आमचे घर सदाशिव पेठेत मध्यवर्ती असल्याने आमच्या घराचा आश्रम झाला होता. घरी साधकांचे सत्संग व्हायचे. त्या वेळी साधकांसाठी खाऊ किंवा स्वयंपाक करणे इत्यादी सर्व आईने केले. तेव्हा तिने कधीच पैशांचा विचार केला नाही. तिने मुक्तहस्ताने सर्वांना सर्वकाही दिले.

२. दुपारच्या उन्हात पाकिटे द्यायला किंवा काही सेवांच्या निमित्ताने काही साधक घरी यायचे. तेव्हा आई त्यांच्यासाठी ताक करून ठेवायची.

३. आई-बाबांमधील समान गुण

अ. आई-बाबांनी तरुणवयात हिमालयात जाऊन तेथील कडाक्याच्या थंडीतही अनेक अवघड ठिकाणी गिर्यारोहण (‘ट्रेक’) केले आहे. दोघेही निसर्गात ईश्‍वर शोधतात. तो निसर्ग म्हणजे त्यांच्यासाठी निर्गुण, निराकार परामात्मा होता.

आ. हिमालयातील उंच शिखरांवर गिर्यारोहण करायला ते मलाही आनंदाने पाठवतात. ‘मी मुलगी आहे’, या विचारांनी त्यांनी मला कधीही अडवले नाही. आवश्यक ती काळजी घेऊन त्यांनी मला सर्व ठिकाणी जाऊ दिले आणि स्वावलंबीही बनवले.

इ. आई-बाबा माझ्याशी एखाद्या समवयस्क मित्राप्रमाणे बोलतात. योग्य ठिकाणी कठोरतेने चुकीची जाणीवही करून देतात. ‘माझ्या मनात काय आहे ?’, हे जाणून ते मला योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला त्यांचा ताण येत नाही.

४. दोघांनाही ‘स्वतःमध्ये भाव नाही’, असे वाटणे

दोघांनाही ‘स्वतःमध्ये भाव नाही’, असे वाटते. ‘खरेतर वर्ष २००० मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ साधना चालू करणे, श्री गुरु सांगतील, तेथे जाऊन सेवा करणे, साधनेत इतकी वर्षे टिकून रहाणे, सर्व साधकांचे आदरातिथ्य मनापासून करणे, सेवेत अचूकता आणि परिपूर्णता असणे’, हे त्यांच्यामध्ये अव्यक्त भाव असल्याचेच दर्शवते’, असे मला वाटते. ‘भाव शब्दांतून व्यक्त करता आला नाही, म्हणजे भाव नाही’, असे नाही. मला आई-बाबांच्या कृतीत भाव दिसतो.

५. कृतज्ञता

अशा माझ्या आई-बाबांना कुणाची उपमा द्यावी. ‘उमा-महेश’ हे जगाचे माता-पिता आहेत. तत्त्वरूपाने आई-बाबा माझ्यासाठी उमा-महेशच आहेत.

६. माझियासाठी तूच सदाशिव, तूच भवानी ।

तो निर्गुण-निराकार नसे अन्य स्थानी ।
माझियासाठी तूच सदाशिव, तूच भवानी ॥ १ ॥

‘माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्‍वरः ।’ ही देववाणी ।
तद्नुसार माझियासाठी तूच सदाशिव, तूच भवानी ॥ २ ॥

जयांची सेवा करता, होते पृथ्वीप्रदक्षिणेची फलप्राप्ती ।
माझियासाठी तूच सदाशिव, तूच भवानी ॥ ३ ॥

पहा पुंडलिकाचा महिमा अगाध ।
ज्याने मातृ-पितृ भक्तीद्वारे जिंकले हरीच्या मनास ॥ ४ ॥

श्रावण बाळाचे गोडवे किती गाऊ आज ।
शतजन्म व्यय होतील, तुमचे ऋण फेडण्यात ॥ ५॥

‘अनाथा’चे नाथ तुम्ही । कृतज्ञ आहे मी गुरुदेवांचरणी ।
तत्त्वरूपात माझियासाठी तूच सदाशिव, तूच भवानी’ ॥ ६ ॥

(११.२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक