८७ टक्के भारतीय उद्योगांचा ‘वर्क फ्रॉम होम’ कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विचार !- सर्वेक्षणाचा निष्कर्ष

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – कोरोनामुळे अनेक आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना चालू केली. आज एक वर्षानंतरही ही स्थिती कायम आहे. कोरोनाच्या संक्रमणातही पुन्हा वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षण केलेल्या उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. हा अहवाल भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि जर्मनी या ६ देशांतील महत्त्वाच्या उद्योग व्यवसायांविषयीच्या निरीक्षणांवर आधारित आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ची प्रभावीपणे आणि सुरळीतपणे कार्यवाही झाल्यामुळे या देशांतील उद्योग-व्यवसाय पैशांची बचत करू शकले. महामारीमुळे झालेल्या दळणवळण बंदीमुळे कित्येक जण बेरोजगार झाले, ह सत्य असले, तरी वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांचा पर्याय अनेकांच्या नोकर्‍या वाचवूही शकल्या. एकट्या अमेरिकेत या पद्धतीमुळे २ लाख २८ सहस्र नोकर्‍या वाचल्या.