रुग्ण आढळण्याच्या टक्केेवारीत वाढ
पणजी – राज्यात ३० मार्च या दिवशी कोरोनाबाधित १२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण गेल्या १४ दिवसांपासून वाढत ३० मार्चला ८.४ टक्क्यांवर पोचले आहे. ३० मार्च या दिवशी कोरोनाविषयक १ सहस्र ५०४ चाचण्या करण्यात आल्या. यांमधील १२७ जण म्हणजे ८.४ टक्के लोक कोरोनाबाधित आढळले. मागील २४ घंट्यांमध्ये १३६ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत, तर एका रुग्णाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यामुळे राज्यातील प्रत्यक्ष उपचार घेणार्या (अॅक्टीव्ह) एकूण रुग्णांची संख्या १ सहस्र ४१९ झाली आहे. राज्यातील आरोग्य केंद्रांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणेआहे.
मडगाव १६७, पणजी १५७, पर्वरी ११८, फोंडा १०७, कांदोळी १०७, वास्को ९०, म्हापसा ८६, कुठ्ठाळी ६९, कासावली ६१ आणि शिवोली येथे ५३ रुग्ण आहेत. ६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे गोमंतकियांना आवाहनलसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !तपोभूमी, ३० मार्च (वार्ता.) – ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी कोरोनाची लस घ्यावी. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास हळूहळू कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या उणावू लागेल. कोरोना महामारीशी संबंधित सर्वांनी सरकारी नियम, तसेच डॉक्टरवर्ग वेळोवेळी देत असलेल्या सर्व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करावे. असे न केल्यास पुन्हा आम्हाला गतवर्षीप्रमाणचा काळ पुन्हा भोगावा लागणार आहे. कोरोनाची लस मोठे नेते आणि डॉक्टर यांनी घेतली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोना विषाणू नष्ट करण्याच्या कार्याला सर्वांनी हातभार लावूया, असे आवाहन तपोभूमी, कुंडई येथील पिठाधीश धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी केले आहे. सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आलेल्या एका चलचित्राद्वारे (व्हिडिओद्वारे) स्वामीजींनी हे आवाहन केले आहे. |