सिंधुदुर्गात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन सतर्क

पोलीस तपासणीनाक्यांवर प्रवाशांची तपासणी चालू

सिंधुदुर्ग – महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आगामी शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण आणि कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करूळ येथील पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांसह आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणार्‍या नागरिकांनी कोरोनाशी संबंधित चाचणी केलेली असणे आवश्यक आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करणे, ही व्यक्ती कोणत्या भागातून आली आहे, याची माहिती घेणे, प्रवास कसा केला, याची माहिती घेणे, तसेच प्रवाशांची तपासणी करणे आदी कामे आरोग्य पथकाकडून करण्यात येत आहेत.

मालवण येथील व्यापार्‍यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन

मालवण – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार मालवण शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, फळ, भाजी आणि मासे यांचे विक्रेते, स्टॉलधारक यांनी स्वत: आणि त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांनी

१५ एप्रिल २०२१ पर्यंत नगरपरिषदेच्या अल्पबचत सभागृहातील कोरोना स्वॅब तपासणी केंद्रात सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ तपासणी करून घ्यावी, अशी सूचना मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन ५७ रुग्ण

१. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र ९०३

२. उपचार चालू असलेले रुग्ण ३२२

३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ३९४

४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १८१