मंदिरांच्या जिर्णोद्धाराविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊ !
कोल्हापूर, २१ मार्च (वार्ता.) – विशाळगडावरील असलेल्या हिंदूंच्या २१ हून अधिक मंदिरांचा विकास न होता त्यांचा आकार न्यून होत आहे आणि त्या भूमीवर अतिक्रमण होत आहे, ही गंभीर गोष्ट आहे. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने मला निवेदन देऊन या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. तरी विशाळगडावर झालेले अतिक्रमण, तसेच तेथील मंदिरांचे काय करता येईल ते पहाण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. या विषयाच्या संदर्भात मी प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या खात्याचे मंत्री श्री. एकनाथ शिंदे, पुरातत्व खाते, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशीही चर्चा करणार आहे. जिल्हाधिकार्यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.
विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने २० मार्च या दिवशी श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. बाबासाहेब भोपळे, तसेच अन्य उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झालेला पन्हाळा ते पावनखिंड संग्राम अनुभवण्यासाठी, पहाण्यासाठी केवळ देशपातळीवरूनच नाही, तर जागतिक स्तरावरून लोक येतात. अनेक शिवप्रेमी, गडप्रेमी संघटना या मार्गावर यात्रा काढतात. त्यामुळे या मार्गाचे ऐतिहासिक जतन होण्यासाठी या मार्गावर ठिकठिकाणी फलक लावणे, मार्ग चांगला करणे यांसह जे जे करणे शक्य आहे ते करू. याचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी या संग्रामाचे एक भव्य शिल्प उभे करू. त्याचप्रकारे विशाळगडावरील हिंदूंची दुर्लक्षित मंदिरे, समाधी, ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी राज्य नियोजन मंडळातून स्वतंत्र निधीची तरतूद करू आणि एक वर्षांच्या आत हे काम पूर्ण करू.’’
जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्यात ८ दिवसांच्या आत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू ! – पालकमंत्र्यांचे कृती समितीला आश्वासन
कोल्हापूर – या संदर्भात कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. सतेज पाटील यांनी वेळ देऊ सर्व विषय ऐकून घेतला आणि सर्व माहिती घेतली. ‘‘या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांची ८ दिवसांच्या आत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू.’’, असे आश्वासन सतेज पाटील यांनी समितीला दिले. या वेळी वरील उपस्थितांसमवेत श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठांचे प्रशासनाला निवेदन
विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा !