सोलापूर येथील सौ. राजश्री तिवारी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती

१. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मनातील अलक्ष्मी, म्हणजे नकारात्मकता, स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण करण्यासाठी महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर तिने चैतन्याच्या कुंच्याने नकारात्मकता, स्वभावदोष अन् अहं सुपलीत घेऊन आश्रमाबाहेर नेऊन टाकणे आणि त्यानंतर मनाची सकारात्मकता वाढणे

‘मी लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता रामनाथी आश्रमातील तिसर्‍या माळ्यावरील मोकळ्या जागेतील बाकावर बसले होते. अकस्मात् देवाने मला विचार दिला, ‘आज अलक्ष्मी निःसारण करतात. माझ्या मनातील अलक्ष्मी, म्हणजे नकारात्मकता, स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण करण्यासाठी महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करूया.’ माझ्याकडून लक्ष्मीमातेला कळवळून प्रार्थना झाली आणि मला तिथे मोठ्या प्रमाणात प्रकाशझोत दिसला. मला दिव्य अलंकार आणि वस्त्रे परिधान केलेल्या महालक्ष्मीमातेचे दर्शन झाले. तिचे दिव्य रूप आणि मुखमंडल दिसले. तिच्या हातात चैतन्याचा कुंचा होता. तिने एका क्षणात माझे स्वभावदोष आणि अहं सुपलीत घेतले अन् आश्रमाबाहेर नेऊन टाकले. यानंतर माझ्या मनाची सकारात्मकता वाढली आणि स्वभावदोषांची विचारप्रक्रिया लक्षात येऊ लागली. ‘हे भगवंता, तू ही प्रक्रिया करून घेतलीस, यासाठी अनंत कोटी कृतज्ञता !’

२. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे

१५.११.२०१८ या दिवशी माझा उजवा हात पुष्कळ दुखत होता. त्यामुळे मी लिहू शकत नव्हते. त्या दिवशी भाववृद्धी सत्संगात कु. वैष्णवी वेसणेकर हिने प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्याचा भावजागृतीचा प्रयोग घेतला. तेव्हा मला प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवू लागले. त्यांनी माझ्या दुखर्‍या हातावर दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले. त्या क्षणी मला होणार्‍या वेदना थांबल्या. नंतर मला लिहिता येऊ लागले.

३. ‘आश्रमातील खोलीच्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसणे, तेव्हा गुरुदेवांचे चैतन्य सर्वत्रच्या साधकांचे रात्रीही रक्षण करत असल्याचे लक्षात येणे

एकदा मला रात्री झोप येत नव्हती. त्यामुळे मी रात्री तिसर्‍या मजल्यावरील आगाशीत नामजप करत बसले होते. तेव्हा मला ‘दुसर्‍या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. केवळ गुरुदेवांचे चैतन्यच या सृष्टीत सर्वत्रच्या साधकांचे रात्रीही रक्षण करत आहे’, हे माझ्या लक्षात आले.’

– सौ. राजश्री तिवारी, सोलापूर (४.१२.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक