गोव्यातील रेल्वेस्थानकांवर कोरोनाची चाचणी होत नाही

पणजी, १६ मार्च (वार्ता.) –  गोव्याच्या शेजारी असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असतांना रेल्वेमार्गाने गोव्यात येणार्‍या प्रवाशांविषयी अजून कोणतीही कोरोनाविषयक तपासणी केली जात नाही, तसेच रस्त्याने गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांचीही तपासणी केली जात नाही. गोव्यातून महाराष्ट्रात जाणार्‍या प्रवाशांसाठी मात्र महाराष्ट्र शासनाने कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र आणणे बंधनकारक केले आहे. सध्या मुंबईहून मडगाव रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रवाशांची थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर वापरून तपासणी केली जात नाही. प्रतिदिन मुंबईतून गोव्यात ५ रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे प्रतिदिन गोव्यात सरासरी १ सहस्र प्रवासी येत आहेत. गेल्या १५ दिवसांत गोव्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘गोव्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आहे’, असे विधान त्यांनी केले होते. गोव्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान गोव्यात येणार्‍या पर्यटकांवरच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत, या माझ्या सूचनेकडे गोवा शासनातील कुणीही लक्ष दिले नाही, असे विधान आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले आहे.