उन्हाळ्यात उद्भवणार्‍या आरोग्यासंबंधीच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

१. अशक्तपणा

अ. सातूच्या (जवांच्या) पिठात तूप आणि खडीसाखर किंवा आमरसात तूप अन् वेलची मिसळून प्यायल्याने अशक्तपणा येत नाही.

आ. रात्री दुधात तूप मिसळून पिणेसुद्धा लाभदायी आहे.

इ. एकसारखा थकवा येत असल्यास दूधभात जेवावा.

२. जास्त तहान लागणे आणि अस्वस्थपणा

अ. धने, बडिशेप आणि खडीसाखर यांची समभाग पूड करून ठेवावी. यातील १ चमचा मिश्रण १ पेला पाण्यात घंटाभर भिजत ठेवावे आणि त्यानंतर ढवळून प्यावे. यामुळे उष्णतेच्या विकारांमध्येही लाभ होतो.

आ. शहाळ्याचे पाणी, सरबत, उसाचा रस, पन्हे, बेलफळाचे सरबत इत्यादींनी लगेच लाभ होतो. यामुळे उन्हामुळे होणारी जळजळ शांत होते. कृत्रिम शीतपेये प्यायल्याने क्षणिक सुख मिळाले, तरी त्यांच्यामुळे शरिरातील उष्णता वाढते आणि इतर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.

३. अतीसार (जुलाब होणे)

दह्याच्या वरचे पाणी २ चमचे प्यायल्याने लगेच आराम मिळतो.

४. उन्हाच्या झळा लागणे

अ. शरिराला कांद्याचा रस लावावा.

आ. कैरीचे पन्हे प्यावे.

५. चक्कर येणे

डोक्यावर आणि तोंडवळ्यावर लगेच थंड पाण्याचे हबके मारावेत, तसेच थंड आणि पातळ पदार्थ प्यायला द्यावेत.

६. उकडणे

अ. कपभर दुधात चमचाभर गुलकंद घालून ते प्यावे.

आ. मोरावळा, सातू (जवांचे पीठ), लोणी – खडीसाखर, साखर घालून कोहळ्याचा रस हे पदार्थ लाभदायी आहेत.

७. लघवीच्या वेळी जळजळ होणे

अ. उष्णतेमुळे लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास कापलेल्या काकडीवर खडीसाखरेचे चूर्ण पेरून वरून लिंबू पिळून ती खावी.

आ. १ पेला काकडीच्या रसात पाव लिंबू पिळून त्यात अर्धा चमचा जिर्‍याची पूड घालून प्यावे.

उन्हाळ्यात काय करावे ? काय करू नये ?

उन्हाळ्यातील आहारात गोड, पचायला हलके, स्निग्ध, शीत आणि पातळ पदार्थ असावेत. खरबूज, टरबूज, मोसंबी, संत्री, केळी, गोड आंबे, गोड द्राक्षे, बेलफळे, ऊस, ताजे नारळ किंवा शहाळी, लिंबू यांसारखी फळे खावीत. पडवळ, कोहळा, पुदिना, कोथिंबीर यांसारख्या भाज्या आहारात असाव्यात. गायीचे दूध आणि तूप घ्यावे. सरबत, पन्हे, सातू (जवांचे पीठ) इत्यादींचे सेवन हितकर आहे. रणरणत्या उन्हात फिरणे, रात्री उशिरा आणि अधिक भोजन करणे टाळावे.

(संदर्भ : मासिक ‘ऋषी प्रसाद’, एप्रिल २०१५)