हरिद्वार येथील कुंभमेळा क्षेत्रामध्ये १० ते १२ मार्च या कालावधीत कोरोनाचा अहवाल आणि आरोग्य प्रमाणपत्र दाखवणार्या भाविकांनाच प्रवेश देण्यात यावा, असा आदेश उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी दिला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र स्नान असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे किंवा बस यांच्याद्वारे कुंभला येणार्या भाविकांकडे कुंभमेळ्याची नोंदणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह (नकारात्मक) अहवाल असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी नसणार्यांना रेल्वेस्थानक अथवा बसस्थानक यांच्या बाहेर सोडले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याचसमवेत कुंभमेळ्याच्या ठिकाणी सामाजिक अंतर न राखणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच कोरोनाची ‘रॅपिड टेस्ट’ही करण्यात येणार आहे. कुंभस्नानासाठी प्रत्यके आखाड्याला केवळ २० मिनिटे देण्यात येणार आहेत.