कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) – मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास ५ जुलै २०२० या दिवशी प्रारंभ झाला. कामाला प्रारंभ केल्यावर कुंडाच्या परिसरातील विद्युत् जनित्र, विद्युत् खांब, फुलांची दुकाने, दत्त मंदिराजवळील दुकाने हालवणे यांसह अनेक अडथळे आम्ही पार केले. या कुंडाची भूमी महापालिकेकडून कह्यात घेण्यासाठीही आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. कुंड आता बर्यापैकी खुले होत आले असून त्यावर ‘माऊली लॉज’च्या असलेल्या अतिक्रमणामुळे ते पूर्णत: खुले करण्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी ८ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे सदस्य श्री. शिवाजीराव जाधव, श्री. राजेंद्र जाधव, मूर्ती अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, श्री. प्रसन्ना मालेकर, वास्तूविशारद अमरजा निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.
१. या ‘लॉज’चे कुंडाच्या जागेवर असलेले बांधकाम हे पूर्णत: अवैध आहे. नगररचना विभागाच्या नोंदीनुसार ही भूमी समितीचीच आहे. या ‘लॉज’ला बांधकाम पूर्णत्वाचा परवाना नाही. इतर दुकानांप्रमाणे ‘लॉज’च्या मालकांशी आमची चर्चा चालू असतांना ते न्यायालयात गेले आणि ही भूमी हस्तांतर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
२. कुंडावरील ‘लॉज’चे बांधकाम सध्या न्यायप्रविष्ट असल्याने या बाजूकडील खोदकाम सध्या बंद आहे. हे कुंड खुले करण्याच्या कामात ‘माऊली लॉज’ मोठ्या प्रमाणात अडथळे आणत असून मध्यंतरी या कुंडाच्या संदर्भात प्रसारित करण्यात आलेला वादग्रस्त व्हिडिओ या ‘लॉज’वरूनच काढून तो प्रसारित करण्यात आला असावा, अशी आमची शंका आहे. या प्रकरणी आम्ही ‘सायबर क्राईम’कडे तक्रार नोंदवली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेले दोन मोठे पडदे या ‘लॉज’च्या मालकांनी दोन वेळा फाडून टाकले.
३. कुंडाच्या संदर्भात जाणकार लोकांकडून माहिती घेतली असता ‘त्या कुंडास १५ पायर्या असून ते ६० फूट बाय ६० फूट असेल’, अशा गोष्टी समोर आल्या. यानुसार साधारणत: प्राथमिक टप्प्यात १९ फूट ८ इंच इतके खोल खोदकाम होण्याच्या दृष्टीने रूपरेषा सिद्ध करण्यात आली होती.
४. हे कुंड खुले करतांना जे.सी.बी. चा अथवा यंत्राचा वापर न करता त्याच्या कोणत्याही मूळ बांधकामास धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने खोदकाम करण्यात येत आहे.
५. चालू स्थितीत अपेक्षेपेक्षा अधिक खोदकाम करावे लागत असून सध्या २६ फूट ३ इंच खोदकाम पूर्ण झाले आहे. खोदकाम अजून १३ फूट करावे लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी एक ते दीड मासाचा कालावधी लागेल. त्यानंतर याची डागडुजी आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचा आराखडा सिद्ध करून त्यापुढील काम करण्यात येईल.
‘मंदिरावर सहस्रो टन कोबा असून त्यामुळे त्यावर अतिरिक्त बोजा पडत आहे’, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने काही मासांपूर्वी देण्यात आली होती. ‘त्या संदर्भात पुढे काय झाले ?’, असे पत्रकारांनी विचारले असता वास्तूविशारद अमरजा निंबाळकर म्हणाल्या, ‘‘या संदर्भातील सर्व माहिती पुरातत्व विभागाला पाठवण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.’’
मनकर्णिका कुंड खुले होण्यास प्रारंभ होणे, हे हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेल्या लढ्याचेच यश ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामात पुढाकार घेणार्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे अभिनंदन ! कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने हा अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन होणे अत्यावश्यक आहे. हिंदु विधीज्ञ परिषदने सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या ३ सहस्र मंदिरांमधील भ्रष्टाचार, अनियमितता, मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण यांसह अनेक गोष्टी उजेडात आणल्या. मनकर्णिका कुंड खुले होण्यास प्रारंभ होणे, हा हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेल्या लढ्याचेच एक यश आहे. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने होत असलेल्या चौकशीद्वारे सर्व भ्रष्टाचार्यांना शिक्षा होईपर्यंत हा लढा चालूच राहील, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केले.
‘मनकर्णिका कुंडाप्रमाणे काशी कुंडही अद्याप बंदीस्त अवस्थेत आहे, ते खुले करण्यासाठी समिती काय करणार आहे’, असा प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने विचारला असता ‘मनकर्णिका कुंडाचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच तेही काम हाती घेऊ’, असे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी सांगितले.
हे कुंड खुले करतांना यातून काही जुन्या वस्तू, दगडी अवशेष मिळत आहेत. यात प्रामुख्याने शिवलिंग, तांब्याची नाणी, छोटी बंदूक, काडतूस, देवतांच्या मूर्ती यांचा समावेश आहे. या वस्तू वर्गीकरण करून, नोंद करून त्या सुरक्षित ठेवण्यात येत आहेत. या सर्वांचे जतन करण्यात येत असून चांदीच्या पालखीप्रमाणे लवकरच या सर्वांचा संग्रह नागरिकांना पहाण्यासाठी खुला करण्यात येणार आहे, असे श्री. जाधव यांनी सांगितले. हे सर्व काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालू असून ते गोपनियता आणि सुरक्षितता यांसाठी कुंडाच्या ठिकाणी भाविकांना प्रवेश देण्यात आलेला नाही.
विशेष
हे कुंड खुले करण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्या वास्तूविशारद अमरजा निंबाळकर यांच्यासह अन्य काही महिलांचा ८ मार्च या महिलादिनाच्या निमित्ताने या प्रसंगी सत्कार करण्यात आला.