मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – ज्या भारतीय सैनिकांनी उणे तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्या सैनिकांविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चीनसमोर पळ काढला’, असे बोलून सैनिकांचा अवमान केला आहे. उणे ३ अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्य चीनशी लढले. एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही. चिनी सैनिकांना मागे जावे लागले. देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे; मात्र अशा सैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी अवमान केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. मुख्यमंत्र्यांना इतिहास माहीत नाही. विधानसभेत त्यांनी अज्ञानातून भाषण केले. जे खंडणी वसुली करतात, त्यांना श्रीराम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय ? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी ‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करून दाखवावे. त्यांच्याकडून हे शक्यच नाही.
२. हिंदुद्वेषी शरजील उस्मानी हा उत्तरप्रदेशातील आहे; पण त्या शरजील याचे उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या विरोधात बोलण्याचे धाडस नाही. तो महाराष्ट्रात येऊन बोलून जातो, त्याच्या केसाला हात लावायची या सरकारची हिंमत नाही.
३. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर अडीच वर्षांसाठी शिवसेना-भाजप पक्षांकडे मुख्यमंत्रीपद देण्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता. ‘खोटे बोल पण रेटून बोल’, हे नवे रूप पहायला मिळाले.
४. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न नाही; पण सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.
५. ‘संभाजीनगर’विषयी हास्यास्पद वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ‘कंटेट’ असेल, तर प्रतिक्रिया देता येते. शिवसेना स्वातंत्र्यलढ्यात नव्हती; पण डॉ. केशव हेडगेवार संघाचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी होते. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.
६. जसे सरकारने राज्यपालांना दिलेले भाषण महाराष्ट्राला दिशा देणारे नव्हते, तसेच विधानसभेतील मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकातील भाषण होते.
७. कोविडविषयी विरोधकांनी मांडलेल्या सूत्राविषयी एकही उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत.
८. राष्ट्रद्रोह म्हणता, आम्ही त्यांच्यावर टीका केली, तर महाराष्ट्रद्रोही ! तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला, तर महाराष्ट्रद्रोही.