देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी ‘साधनेचा प्रवास’ याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. माघ शुक्ल पक्ष अष्टमी (२० फेब्रुवारी) या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस होता. त्यानिमित्त २० फेब्रुवारी यादिवशी या संवादातील पहिला भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

भाग २

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/452728.html

पू. शंकर गुंजेकर

७. देवाची पापी घेतल्यावर देवाने गळ्यात साप टाकणे, तेव्हा चूक लक्षात येऊन पापी घेणे बंद करणे

पू. शंकरमामा : आई आणि मंगल उपवास करायच्या. घरात सगळ्यांनाच देवाविषयी आवड निर्माण झाली. शेतावर देवाचे छायाचित्र लावत होतो. मळणी झाल्यावर घरी यायचो. तेव्हा मला त्याला सोडून येतांना पुष्कळ वाईट वाटून रडायला यायचे. मग मी घरातून पुन्हा तिकडे जायचो आणि देवाला सांगायचो, ‘उद्या येतो हां !’ मग असे किती वेळा जायचो आणि किती वेळा परत यायचो. त्यात माझा वेळ जायचा. मला तेव्हा काही कळत नव्हते; पण देवाने ओळखले, ‘हा जाणारच नाही.’ म्हणजे मी तिथेच रहायचो. ‘उद्या येतो, उद्या येतो’, असे करतांना दिवस मावळायला लागायचा. मी पुढे जायचो आणि पुन्हा परत यायचो. माझे समाधानच होत नव्हते. मग मी देवाचा मुका घ्यायचो. माझी चूक लक्षात आणून देण्यासाठी देवाने काय केले ? एका सापाने माझ्या गळ्यात उडी मारली.

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे !

पू. शंकरमामा : मी सापाला उडवून टाकले; पण मी घाबरलो. लांब राहिलो आणि देवाला म्हणालो, ‘आजपासून मी तुझी पापी घेणार नाही. माझी चूक झाली. मला क्षमा कर.’ तेव्हापासून देवाची पापी घेतली नाही. तेव्हा मला वाटले, ‘मी देवाची पापी घेतली; म्हणूनच देवाने असे केले, म्हणजे ती चूक असणार.’ मग मी घरी आलो.

पू. शंकर गुंजेकर यांच्याशी संवाद साधतांना कु. प्रियांका लोटलीकर (वर्ष २०१६)

८. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती येणे

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे ! किती अनुभूती आहेत तुमच्या ! त्यानंतर तुम्ही सनातनमध्ये कधी आलात ?

पू. शंकरमामा : १५ किंवा १६ वर्षे झाली.

कु. प्रियांका लोटलीकर : मग तुम्ही सत्संगाला जायला लागलात.

पू. शंकरमामा : हो. त्यांना बोलावून घेतले.

९. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला लागल्यानंतर ‘कंपाऊंड’चे काम मागील ६ वर्षे होत नव्हते, ते केवळ १५ दिवसांत विनासायास होणे, तेव्हा ‘सनातन संस्थेत शक्ती आहे’, अशी निश्‍चिती होणे

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही तेव्हा कशा प्रकारची साधना करत होतात ? सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर प्रसाराला जाणे इत्यादी कशा प्रकारे केलेत ?

पू. शंकरमामा : साधकांनी सत्संग घेतला. सत्संगामध्ये ‘कुलदेवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रास न्यून होण्यासाठी दत्ताचा नामजप करायचा’, असे सांगितले. मी दोन सत्संगामध्ये त्यांचे बोलणे ऐकून घेतले. ‘मला हे कळते आणि हेच सांगतात’, असे वाटले; पण देवाविषयी बोलतात, तर ऐकत बसायचो. तिसर्‍या सोमवारी मनात ठरवले, ‘एवढे सांगतात ना, मग बघूया.’ आमच्या बाजूचे लोक आम्हाला ‘कंपाऊंड’ करू देत नव्हते. शेजारी थोडा श्रीमंत आणि नोकरी करणारा होता. आम्ही गरीब असल्यामुळे तो आमचे ऐकत नव्हता. सारखी तक्रार करायचा. मी देवाला सांगितले, ‘आजपासून मी सनातनने सांगितल्याप्रमाणे नामजपाला आरंभ करत आहे. हे ‘कंपाऊंड’ या वर्षी तंट्याविना, काही मारामारी न होता झाले, तर या सनातनमध्ये काहीतरी शक्ती आहे’, असे मी समजेन.

मग मी कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप चालू केला. १५ दिवस झाले आणि शेजारच्याचा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘शंकर, इकडे कूप (कंपाऊंड) करूया. सामान आणून टाक.’’ मी म्हणालो, ‘‘तुझा भाऊ करू देत नाही.’’ तो म्हणाला, ‘‘कसा करू देत नाही, ते बघूया. मी करून देतो.’’ त्याने ते ‘कंपाऊंड’ करू दिले. त्याने त्याच्या भावाला सांगितले, ‘‘आता हे ‘कंपाऊंड’ मोडशील, तर वाईट होईल.’’ मग माझी निश्‍चिती झाली, ‘मागील ६ वर्षे पोलीस ठाण्यात सांगूनही ‘कंपाऊंड’ झाले नाही, ते केवळ १५ दिवस नामजप केल्यानंतर झाले. म्हणजे या सनातनमध्ये काहीतरी शक्ती आहे.’

१०. रात्री नदीत उतरल्यावर अंगावर भला मोठा साप चढणे आणि तो एकदम चमकत असल्याचे दिसणे

पू. शंकरमामा : मला पूर्वी एक अनुभूती आली होती. आमचे काका आणि मी नदीत पाण्यात मासे पकडण्यासाठी जाळी घालत होतो. तेव्हा मागून मोठा साप आला. तो एवढा होता की, ‘मोठ्या प्राण्यालाही त्याने अख्खा गिळला असता !

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे त्याचे तोंड मोठे होते ?

पू. शंकरमामा : तोंडच नव्हे, तर अंगही मोठे होते.

कु. प्रियांका लोटलीकर : साधारण केवढा होता ?

पू. शंकरमामा : साधारण त्याची लांबी २० फूट असेल. तो माझ्या पाठीवर चढला. मला वाटले, ‘पूर्वीच्या काळी भूते-बिते असायची. ‘ती भीती दाखवायची’, असे बाबांनी मला सांगितले होते. तसेच कुणीतरी असेल.’ ‘ती कशी असतात बघूया’; म्हणून मी फिरलो. तेव्हा तो खाली उतरला आणि मला भीती दाखवायला समोरून आला. तेव्हा मी त्याला बघून घाबरलो. एका हातात जाळी धरून एका हाताने पाणी मारत होतो. मी मोठ्याने आरडाओरड चालू केला. काका म्हणाले, ‘‘भिऊ नकोस, पाणी मार’’; पण माझ्या अंगात कापरे भरले होते.

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे !

पू. शंकरमामा : नंतर काकांनी देवाला सांगितले कि काय ? मला ठाऊक नाही. तेव्हा मी काही देवाला सांगितले नाही; पण तो साप नदीतून परत जातांना पाहिला. तो फार मोठा आणि चकचकीत दिसत होता. ती रात्रीची वेळ होती. पौर्णिमेच्या चांदण्यात तो एकदम चमकत होता.

कु. प्रियांका लोटलीकर : साधारण कुठल्या रंगाचा होता ?

पू. शंकरमामा : तसे काही समजले नाही. केवळ तो चमकत होता.

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुमची शिवाची भक्ती असल्यामुळे तो कदाचित् शिवाचाच नाग असेल.

पू. शंकरमामा : नदीच्या वरच्याच बाजूला शिवाची पिंडी होती आणि आरंभी मी तिथे पूजा करायचो.

११. प्रसार करतांना लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देता आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःच्या माध्यमातून बोलतात’, असे वाटून धर्मप्रसार आणि सेवा करण्यातून आनंद मिळू लागणे

कु. प्रियांका लोटलीकर : देवाने तुम्हाला दर्शन दिले, तरी तुम्हाला सनातन संस्थेमध्ये येण्याची ओढ कशी लागली ? सनातनमध्ये आल्यानंतर ‘साधना करूया, धर्मप्रसार करूया’, असे कधीपासून वाटायला लागले ?

पू. शंकरमामा : सत्संगामध्ये सांगितल्याप्रमाणे १५ दिवस नामजप केल्यावर मला अनुभूती आली. तेव्हापासून मला आवड निर्माण झाली. साधक सेवा करायला सांगायचे. ती मी थोडी थोडी करायला लागलो. साधक मला देवळांमध्ये साफसफाई, दैनिक वितरण अशा सेवा द्यायचे. मी ती करायचो. प्रसारासाठी बाहेर पडल्यावर कुणीतरी विरोध करण्यासाठी म्हणायचे, ‘असेच म्हणजे काय ? तसेच म्हणजे काय ?’ मी शिकलेलो नव्हतो, तरी तिथे मला बोलायला थोडे जमत होते. ‘घरी जमत नाही आणि बाहेर गेल्यावर कसे जमते ?’, तेव्हा माझ्या मनात आले, ‘परम पूज्यच माझ्या माध्यमातून बोलतात ना !’ मला असा विश्‍वासही वाटला; कारण कुणीही कसलाही प्रश्‍न विचारला, तरी मला त्याचे उत्तर द्यायला जमत होते. मग माझ्या लक्षात आले, ‘हे देवच करवून घेत आहे. मला त्यातून आनंद मिळायला लागला आणि ‘मला बोलायला जमत आहे’, याचाही एक प्रकारचा आनंद झाला. आता दोन वर्षे झाली, मी बाहेरचे काम केले नाही. केवळ शेतीची कामे करतो. ‘मी दिवसा प्रसार करतो, कुठेही असले, तरी कुणालाही वैयक्तिक जाऊन भेटून बोलतो. कुणाच्या घरी गेलो, तरी केवळ साधनेविषयी बोलतो. सनातन पंचांग मागवतो आणि त्याचे गावात वितरण करतो’, अशी सेवाच करतो.

(क्रमशः) 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453935.html