देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी ‘साधनेचा प्रवास’ याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. माघ शुक्ल पक्ष अष्टमी (२० फेब्रुवारी) या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस होता. त्यानिमित्त २३ फेब्रुवारी या दिवशी या पू. शंकर गुंजेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453613.html


पू. शंकर गुंजेकर

१२. शेतकर्‍यांनी राजकारणी किंवा सरकारवर अवलंबून न रहाता देवावर अवलंबून रहायला हवे !

कु. प्रियांका लोटलीकर : बरेच शेतकरी सरकार आणि राजकारणी यांवर अवलंबून असतात. कुणी देवावर अवलंबून असतेच, असे नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट व्हायला लागते. प्रत्येक शेतकर्‍याने सरकारवर अवलंबून न रहाता देवावर अवलंबून राहिले पाहिजे. ‘जो भक्ती करतो, त्याचे सगळे देवच करत असतो’, हे यातून लक्षात येते. देव त्याला कुठल्याच गोष्टीची न्यूनता भासू देत नाही.

पू. शंकरमामा : ‘देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही’, असा माझा १०० टक्के विश्‍वास आहे. मी आता सगळ्यांना सांगतो, ‘मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे मिळवले, घरदार सगळे केले ना ? मग पुढची सिद्धता काय केली ? चौर्‍याऐंशी लक्ष योनी फिरून एकदा मनुष्यजन्म मिळतो. परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेे आहे, ‘दोनच कारणांसाठी मनुष्यजन्म मिळतो. प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे.’ मुलांसाठी सिद्धता करणारे आम्ही कोण ? त्यांची सिद्धता देवानेच केली आणि नंतर त्यांना जन्माला घातले. ‘माझी मुले, माझे हे, ते’, असे म्हणणे चूक आहे. मला असे वाटते, ‘ही मुले म्हणजे देवाचे दागिने आहेत. देवाचे देवच घेणार ना ! आम्ही म्हातारे होईपर्यंत ‘माझा मुलगा, माझे हे, माझे ते’, असे कशाला म्हणतो ?’

कु. प्रियांका लोटलीकर

१३. व्यष्टी लिखाण करत नसल्याने संतांच्या मार्गदर्शनाला बसता न येणे

पू. शंकरमामा : परम पूज्यांनी सांगितले, तसे मलाही जमले नाही. मी मनाने थोडे केले; पण स्वभावदोष सारणी लिहिली नाही. प.पू. देशपांडेकाका एकदा रामनगरमध्ये आले होते. तेव्हा साधक झालेल्या चुका स्वभावदोष सारणीत लिहायचे. मला लिहायला येत नाही. ‘जे सारणी लिखाण करत नाहीत, त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला बसायचे नाही’, असे आम्हाला सांगितले होते. तेव्हा मला वाटायचे, ‘मला नको म्हटले, तर चांगले. त्याविषयी काही विचारले, तर मी काय सांगणार ? मी बाहेरची काही सेवा असेल, तर ती करीन.’ मग बाहेरची सेवा घेतली आणि सारणी लिखाण करणारे साधक आत बसले.

१३ अ. समष्टी प्रार्थना केल्यावर ताप गेल्याची आलेली अनुभूती

१३ अ १. पू. निकमतात्या बेळगावमध्ये आले असतांना केवळ सारणी लिखाण करणार्‍या साधकांना त्यांच्या मार्गदर्शनाला नेले जाणे आणि अंगात ताप असतांनाही दैनिक वितरण करायला सांगितले जाणे : बेळगावमध्ये पू. निकमतात्या आले होते. तेव्हा एक साधक मला म्हणाले, ‘‘जे साधक सारणी लिखाण करतात, त्यांनाच पू. तात्यांकडे घेऊन जायचे आहे. तू काही सारणी लिखाण करत नाहीस. तू दैनिक वितरण कर.’’ मला ताप होता. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, मी कसे करू ?’’ तो म्हणाला, ‘‘काहीही करून तू दैनिक वितरण कर.’’ मला खरे तर पुष्कळ ताप होता, तरी ते माझ्यावर दैनिक वितरण सोडून गेले. मी त्याला ‘‘हो’’, म्हणालो.

१३ अ २. पू. निकमतात्यांना ‘साधकांवरील आवरण जाऊदे आणि त्यांना तुमचे चैतन्य मिळूदे’, अशी प्रार्थना करणे, त्यानंतर ताप जाणे : ते साधक बेळगावला गेल्यावर नीताने (आताच्या सौ. केतकी पेडणेकर) मला ‘पू. निकमतात्या कधी येणार ? किती वेळ बसणार ? अमुक वेळेला मार्गदर्शन असणार, अमुक वेळेला संपणार’, असे सगळे सांगितले. मग मी दैनिक वितरण करून आलो आणि त्या वेळेला आमच्या घरी बसून देव, कृष्ण आणि पू. निकमतात्या यांना प्रार्थना केली, ‘आपले साधक पुष्कळ तळमळीने सेवा करतात. त्यांच्यावर आवरण आले असेल, तर तुम्ही ते नष्ट करा. तुमच्या चैतन्याचा त्यांना लाभ होऊ दे. साधकांना चांगले कार्य करण्यासाठी तुम्ही शक्ती द्या.’

१३ अ ३. ‘समष्टीसाठी प्रार्थना केल्यावर देव व्यष्टीतही साहाय्य करतो’, असे शिकायला मिळणे : मी माझ्यासाठी काही मागितले नाही आणि माझ्यासाठी मी मागत नाही अन् प्रार्थनाही करत नाही.’ मी असे म्हणाल्यावर ‘सर्र’ करून माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि माझा ताप संपूर्णपणे गेला. नंतर मला गारवा जाणवला. त्यानंतर मला पुन्हा ताप आलाच नाही. मी मनात पू. निकतात्यांना म्हणालो, ‘मी साधकांसाठी प्रार्थना केली, तर तुम्ही मलाच चांगले केले.’ मला त्यातून शिकायला मिळाले, ‘भाव आणि श्रद्धा असेल, तर कुठूनही आणि कसाही देव अन् परम पूज्य आपल्याला साहाय्य करतात. रामनगरमध्ये राहूनही चैतन्य न्यून पडत नाही.’

कु. प्रियांका लोटलीकर : ‘तुम्ही समष्टीसाठी प्रार्थना केली आणि देवाने तुम्हाला व्यष्टी स्तरावरही त्याचा लाभ करून दिला’, असे मला त्यातून शिकायला मिळाले. देवाने दोन्ही साध्य करून घेतले.

१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सुचलेले भजन !

पू. शंकरमामा : आता परवा दिवशी मी गावी गेलो होतो. जातांना मला परम पूज्यांवर एक भजन सुचले. ‘गप्प न बसता मनातल्या मनात म्हणूया’, या विचाराने मी ते म्हटले. भजन संपल्यानंतर परम पूज्यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘तुमच्या भावाला बोलवा आणि मला भेटून जा.’ तेव्हा ‘मी इथे बोलतो, ते परम पूज्यांना सगळेच कळते’, असे मला वाटले आणि आनंदही झाला.

सांग कधी येऊ आता रामनाथीला । धाव परम पूज्य, पाव परम पूज्य ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला । सांग कधी येऊ आता रामनाथीला ॥ धृ.॥

परम पूज्यांच्या कृपेने पावन झालो । परम पूज्यांच्या कृपेने पावन झालो ।
साधकांच्या बोधाने परिवर्तन झाले । साधकांच्या बोधाने परिवर्तन झाले ।
धाव परम पूज्य … ॥ १ ॥

रामनाथींचे परम पूज्य साधकांच्या घरी । धाव परम पूज्य, पाव परम पूज्य ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला धाव परम पूज्य …॥ २ ॥

धन्य परम पूज्य तुझी रे करणी । धन्य परम पूज्य तुझी रे करणी ।
साधकांची उन्नती, साधकांची उन्नती धाव परम पूज्य …॥ ३ ॥

एकदा तरी येऊन बघ रे रामनाथीला । एकदा तरी येऊन बघ रे रामनाथीला ।
रामनाथीला, रामनाथीला । धाव परम पूज्य …॥ ४ ॥

धाव परम पूज्य, पाव परम पूज्य । सांग कधी येऊ आता रामनाथीला ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला ॥ धृ. ॥

कु. प्रियांका लोटलीकर : किती छान ! भाव जागृत होतो.

१५. पू. शंकरमामा करत असलेल्या काही प्रार्थना !

पू. शंकरमामा : पूर्वी साधक सांगायचे, ‘अशी प्रार्थना करा, तशी प्रार्थना करा.’ खरेतर मी माझ्या मनाला सुचलेली प्रार्थनाच करत होतोे आणि आताही तशीच करतो. ती समष्टी प्रार्थना आहे.

कु. प्रियांका लोटलीकर : प्रार्थनेमधूनही तुमची समष्टी प्रार्थना चालू असते.

पू. शंकरमामा : ‘हे श्रीकृष्णा, ‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज), राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्यासाठी मला शक्ती मिळू दे. माझी आध्यात्मिक उन्नती होऊ दे. माझ्यावर गुरुकृपा होऊ दे. गुरुकृपा जगभर होऊ दे. सनातनचे कार्य पुष्कळ जोमाने आणि वायूवेगाने वाढू दे. सनातन संस्थेला कुठल्याही प्रकारचे अडथळे आणि अडचणी येऊ देऊ नये. आतंकवाद संपूर्णपणे नष्ट होऊ दे’, अशी तुमच्या चरणी कोटीशः प्रार्थना, कोटीशः प्रार्थना.’ हीच प्रार्थना आतापर्यंत मी करत आलो आहे.

१५ अ. प्रसार करतांना स्वतःच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले बोलत असल्याची आलेली अनुभूती

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुम्ही प्रसार करतांना समष्टीसाठी प्रार्थनाही करायचात ?

पू. शंकरमामा : हो. प्रसारात गेल्यावर कुठलीही व्यक्ती भेटली की, ती मला आडवे – तिडवे प्रश्‍न विचारायची. मग मी आधी प्रार्थना करायचो, ‘प. पूज्य बाबा, या व्यक्तीला काय सांगायचे ?’, ते तुम्हीच माझ्या माध्यमातून बोला.’ मग मी बोलायचो. नंतर घरी आल्यानंतर मला आनंद मिळायचा. ‘बघ, परम पूज्य कसे बोलले आणि शेवटी त्यांनी मान्य केले. ‘आजपर्यंत मान्य केले नाही’, असे एकदाही झाले नाही. सगळ्यांना हे सांगितल्यानंतर त्यांनी हात जोडले आणि दंडवतही घातले.

कु. प्रियांका लोटलीकर : देवानेच तुमच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.

पू. शंकरमामा : ‘मी करतो, मी केले’, असे म्हणायचे नाही. ‘मला काहीच कळत नाही. सर्व देवच करतो’, असे म्हणायचे आणि सगळे देवावरच सोपवायचे. शरणागतभावाने रहायचे. ‘देव आपणहूनच सुचवतो आणि देवच करवून घेतो’, असे मला ठामपणे समजले आहे.

(क्रमशः उद्याच्या अंकात)

 या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक