महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी साधनेचा प्रवास याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. आज माघ शुक्ल पक्ष अष्टमी या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पू. शंकर गुंजेकर यांना सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. परिस्थिती कशीही असली, तरी देवावरची श्रद्धा कधीच न्यून न होणे, उलट देवाची पुष्कळ ओढ असणे
कु. प्रियांका लोटलीकर : नमस्कार मामा, आज सकाळी मी देवाला विचारत होते, मी पू. शंकरमामांशी (पू. शंकर गुंजेकर यांच्याशी) प्रथमच बोलणार आहे. त्याचा आरंभ कसा करायचा ? तेव्हा मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) एक भजन आठवले. सावत्या माळ्याने हो, माळ्याने हो, माळ्याने लावला मळा ।, तेव्हा मला सावत्या माळ्याच्या ठिकाणी तुम्हीच दिसला.
पू. शंकरमामा (हसून) : मला देवाची पुष्कळ आवड आणि ओढ होती. मार्गावर कुठलीही श्री गणेशमूर्ती दिसली किंवा उदबत्तीच्या पाकिटावर, पत्रिकेवर, कुठेही देवाचे चित्र दिसले, तर मी ते घ्यायचो. लोक म्हणायचे, हा असा काय वेड्यासारखा देवाची चित्रे गोळा करतो ? त्यामुळे ते दुसरीकडे बघत असतांना मी हळूच देवाची चित्रे उचलायचो. शेतावरच्या गवताच्या झोपडीतील भिंतीला ती बारीक बारीक चित्रे पिठाने चिकटवत होतो. त्या भिंतीला नंतर सारवायची आवश्यकताच नव्हती; कारण भिंतीवर खालपासून वरपर्यंत देवाची चित्रे चिकटवली होती. माझी देवाप्रतीची ओढ पाहून माझ्या बाबांनी मला आमच्या ग्रामदेवतेची पूजा करण्यास सांगितले होते; पण काही वेळा परिस्थितीमुळे बाबा वैतागून मला म्हणायचे, तू देवाची एवढी भक्ती करतोस; पण देवाने तुला असे का केले ? आता तू पूजाही करू नकोस. सोडून दे. तेव्हा मी त्यांना म्हणायचो, बाबा, असे म्हणायचे नाही. पूर्वीच्या जन्माचे काहीतरी असेल.
२. सनातन संस्थेशी परिचय
असे करतांना १५ वर्षे गेली. या १५ वर्षांत कर्जही फेडले गेले. सतत काम करून डोळ्यांखाली काळे आले. माझ्या ओळखीच्या व्यक्तीला सनातनचे साधक भेटत होते. तिला मी देवाविषयी माहिती विचारत होतो. तीही कंटाळली, हा प्रतिदिन येतो आणि देवाविषयी विचारतो. ती मला म्हणाली, सनातनचे साधक टोपी घालून येतात आणि देवाविषयी सांगतात. मी त्यांच्याशी तुमची भेट घालूून देतो. मग मी म्हणालो, कोण ते दाखव. ते लोक पैसे घेतात का ? तेव्हा तिने सांगितले, ते मला काही ठाऊक नाही. मग मी म्हणालो, घेतले, तर घेऊ दे. मी कुणाकडून तरी पैसे घेऊन २०० रु. पर्यंत देतो. मग घरी येऊन आईला विचारले, सनातनचे साधक देवाविषयी सांगतात. त्यांना घरी बोलावू का ? आई म्हणाली, सोमवारी बोलव. मग मी सनातनच्या साधकांना सोमवारी घरी बोलावले.
३. आई-वडिलांनी पुष्कळ चांगले संस्कार केल्यामुळे वाईट मार्गाचा विचारही मनात न येणे
कु. प्रियांका लोटलीकर : एवढी तुमची घरची परिस्थिती बिकट होती, तरी अशा बिकट परिस्थितीत वाईट मार्गाने पैसे मिळवूया, असे विचार तुमच्या मनात कधी आले का ?
पू. शंकरमामा : एक दिवसही असा विचार मनात आला नाही. कुणाला फसवायचे नाही, चोरी करायची नाही किंवा असले काहीच करायचे नाही, असे मला वाटायचे.
कु. प्रियांका लोटलीकर : जे काही होईल, ते माझ्या नशिबानेच होणार, असे वाटत असल्यामुळे देवच सगळे करत आहे, याची जाणीव होती.
पू. शंकरमामा : बाबांनीही मला सांगितले होते, मी असेपर्यंत कुणाचे वाईट चिंतायचे नाही आणि वाईट करायचे नाही. वाईट मार्गाने जायचे नाही. मी कसे केले, तसे तुम्हीही करा. परिस्थिती कशीही राहू दे. त्यांचे हे शब्द मी लक्षात ठेवले.
कु. प्रियांका लोटलीकर : आई-वडिलांनी पुष्कळ चांगले संस्कार केले.
पू. शंकरमामा : ते देवाचे भक्तच होते.
४. देवाशी बोलणे आणि देवाचे दर्शन होणे
पू. शंकरमामा : उद्या आमच्यावर काही संकट येणार असेल, तर शंकर (देव) मला आधीच सांगायचा.
कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुमचे भगवान शंकरांशी प्रत्यक्ष बोलणे व्हायचे.
पू. शंकरमामा : हो.
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला देव कसा दिसायचा ?
पू. शंकरमामा : स्वप्नात दिसायचा. मी पलंगावर डोळे मिटून झोपलो, तर शंकर माझ्याशी बोलत आहे, असे मला वाटायचे. तो म्हणायचा, बघ रे, तिथे जाऊन कुणी काही ठेवले आहे का, ते बघ ? तिथे जाऊन बघितल्यानंतर मला ते मिळायचे. रामनगरहून ८ कि.मी. अंतरावर वैजगाव आहे. त्या गावी मी शेती करत होतो. तेथील लोक चांगले नाहीत. शेतावर मारायलाही यायचे. एकदा माझा बैल शेतातून पळून गेला. तो दुसर्या कुणाच्या शेतात गेला, तर लोक मला शिव्या देतील; म्हणून मला भीती वाटली. मी त्याची पावले शोधत त्या मागे मागे जंगलात गेलो. अर्ध्या जंगलात गेल्यावर मला मोठी शंकराची पिंडी दिसली. पूर्वी कुणी तरी पांडवांनी केली असणार, असे समजून मी तिला हात लावून नमस्कार केला. एक प्रदक्षिणा घातली आणि आमचा बैल कुठे गेला ? ते मला ठाऊक नाही. मला तो मिळू दे, अशी प्रार्थना केली. थोडेसे पुढे गेल्यावर त्या बाजूने आमचा बैल येत होता. मी बैलाला घेऊन गावात आलो आणि गावच्या लोकांना विचारले, या जंगलात शिवाची पिंड आहे का ? ते नाही म्हणाले.
कु. प्रियांका लोटलीकर : पिंड केवढी होती ?
पू. शंकरमामा : बरीच मोठी होती. अंदाजे १० फूट उंचीची होती. तिची गोलाईही मोठी होती. मला तिच्याकडे डोके वर करून बघावे लागत होते; पण गावचे लोक नाही म्हणाले; म्हणून दुसर्या दिवशी पुन्हा जंगलात जाऊन पाहिले, तर तिथे पिंड नव्हती.
कु. प्रियांका लोटलीकर : अरे बापरे ! म्हणजे प्रत्यक्ष शिवानेच दर्शन दिले.
५. भांडणे केल्याने देव घरातून निघून जाईल, या विचाराने भांडण न करण्याचे ठरवणे, तरीही भांडणे होणे, तेव्हा शंकरदेवाचे प्रत्यक्ष दर्शन होणे
पू. शंकरमामा : आमच्या बहिणी काहीतरी निमित्त करून भांडायच्या. मग शंकर मला म्हणाला, तुमच्या घरात प्रतिदिन भांडणे होतात. मी तेथे रहाणार नाही. मला बाजूला एक देऊळ बांधून दे, मी तिथे रहातो.
कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे घरात शंकराची पिंड होती का ?
पू. शंकरमामा : नाही. देव घरातून बाहेर जाईल, या विचाराने मला वाईट वाटायचे. मी शंकराला म्हणालो, मी एवढी भक्ती करून तुला प्रसन्न करून घेतले. आता तू घरीच रहायचे. बाहेर जायचे नाही. मी सगळ्यांना सांगतो, आता काही भांडण करणार नाही; पण तू घरीच रहा. नंतर बहिणींना सांगितले, आता भांडायचे नाही. नाहीतर शंकरदेव मी घरी रहात नाही, असे म्हणतो. भांडणे केलेली त्याला चालत नाहीत. तेव्हा त्याही म्हणाल्या, हो. आम्ही आता काही भांडण करणार नाही. तेव्हा असे काही मला ठाऊक नव्हते. आता सनातनमध्ये सगळे शिकवतात. तेव्हा मला स्वभावदोष इत्यादी काही कळत नव्हते. मी हे सर्व मनानेच करायचो. दुसर्या दिवशी पुन्हा दोघींची भांडणे चालू झाली. त्यांची भांडणे चालू झाली, तेव्हा मी दुसर्या खोलीत होतो. त्यांच्यामधून शंकरदेव आला आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्या दिवशी मी प्रत्यक्ष शंकरदेव बघितला. बहिणींना काही तो दिसला नाही; पण तो मला भांडणार नव्हता ना ? आता भांडायला कशा लागल्या ?, असे विचारील; म्हणून मी त्याच्याकडे वर मान करून बघितलेच नाही. बाजूने हळूच पाहिले.
कु. प्रियांका लोटलीकर : कसे बघितले ?
पू. शंकरमामा : मी मान खाली घालून थांबलो. मला शंकराचे केवळ पाय तेवढे दिसले. त्याच्या गळ्यात घातलेला हार पायापर्यंत आला होता. शंकर चांगला गोरापान आणि सुंदर दिसत होता ! त्यानंतर तो अर्धा घंटा थांबला. नंतर पाय दिसत नव्हते; म्हणून मी वर बघितले.
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही वळून बघितले नाही का त्याच्याकडे ?
पू. शंकरमामा : मी घाबरून बघितले नाही. तो गेल्यानंतर मला वाटले, अरे, मी किती पापी ! देव समोर येऊनही मी तोंडवळाही पाहिला नाही.
कु. प्रियांका लोटलीकर : शंकराची वल्कलेही दिसली का तुम्हाला ?
पू. शंकरमामा : हो. डोगलापासून (गुडघ्यापासून) खाली चांगलेच बघितले. पांढरा हार होता.
कु. प्रियांका लोटलीकर : आणि पाय केवढे होते ?
पू. शंकरमामा : पाय मोठे होते आणि गोरेपान अन् गुबगुबीत होते !
६. अनेक वेळा देवाचे दर्शन होणारे पू. शंकरमामा गुंजेकर !
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला अनेक वेळा देवाने दर्शन दिले ना ?
पू. शंकरमामा : हो. देवाने बर्याच वेळा दर्शन दिले.
कु. प्रियांका लोटलीकर : देवतांचे दर्शन होते, असे आपण केवळ गोष्टींमध्ये ऐकले आहे; पण तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.
पू. शंकरमामा : हो. आता घरात समोरच शंकराचे छायाचित्र लावले आहे. मी त्याच्यासमोर खाटेवर बसतो आणि त्याच्याकडे बघत बसतो. तेव्हा मला वेगवेगळे रंग दिसतात. कधी गुलाबी रंग दिसायचा. मग मी सांगायचो, बघा, आज देवाचा रंग गुलाबी आहे. तोंडवळा कसा दिसतोय बघा.
कु. प्रियांका लोटलीकर : मग इतरांनाही दिसायचे का तसे ?
पू. शंकरमामा : कधी कधी दिसायचे. मंगल (धाकटी बहीण) म्हणायची, हो. मलाही दिसत आहे. आईलाही तसे दिसत होते. मला ते अधिक दिसायचे.
(क्रमशः)
|