केरळमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आले ! – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन्

ई. श्रीधरन् लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

‘देशात ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे आता तरी लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारतील का ?

ई. श्रीधरन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मी लव्ह जिहादच्या विरोधात आहे. केरळमध्ये काय झाले आहे हे मी पाहिले आहे. कशाप्रकारे हिंदु मुलींना फसवले जाते, हे मी पाहिले आहे. तसेच नंतर त्यांचे काय हाल होतात हेही मी पाहिले आहे. केवळ हिंदूच नाही, ख्रिस्ती मुलींचीही फसवणूक करून त्यांची लग्ने लावून दिली जात आहेत. अशा घटना रोखण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ८८ वर्षीय ई. श्रीधरन् यांनी लव्ह जिहादविषयी बोलतांना व्यक्त केली. ‘पक्षाची इच्छा असेल, तर मी निवडणूक लढेन’, असेही ते म्हणाले. ‘मला सक्रीय राजकारणामध्ये रस असून राज्यपाल बननण्याची इच्छा नाही’, असे श्रीधरन् यांनी आधीच स्पष्ट केले आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळ विधानसभेची निवडणूक एप्रिल आणि मे मासामध्ये होणार आहे. सध्याच्या १४० सदस्य असणार्‍या केरळ विधानसभेमध्ये भाजपचा केवळ एक आमदार आहे.

श्रीधरन् यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन् यांना ‘हुकूमशहा’ म्हटले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री अल्प वेळ थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांची लोकप्रियता ओसरली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामासाठी १० पैकी ३ गुणही देता येणार नाही. कोणत्याच मंत्र्याला त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करता येत नाही. ते जे बोलतील ते शब्दही त्यांना मागे घ्यावे लागतात.