तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

नवी मुंबई – तंत्रज्ञानाचा वापर अधिक करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी वाशी येथील परिसंवादात केले. ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

सिंह पुढे म्हणाले की, नवी मुंबईमध्ये वर्षाला २०० ते २५० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. येथे वाहनतळाची समस्या मोठी आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर गुन्हे नोंद आहेत. ते ई-चलानचे (दंडाच्या पावतीचे) पैसे भरत नाहीत. त्यामुळे काही कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. त्याचा भरणा त्वरित न केल्यास थकबाकी वसुलीसाठी आता वाहतूक विभाग कारवाईची मोहीम हाती घेणार आहे.