अ. मनुष्यातील त्रिगुणांमुळे त्याच्याकडून घडणार्या कृतींचे फळ
शुक्रदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये). त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात. चांगले-वाईट यांतील भेद (फरक) कळत असूनही जे मुद्दाम वाईट वागतात, त्यांना मात्र कठोर यातना भोगाव्या लागतात.
आ. पापी माणसांना त्यांच्या पापांनुसार होणार्या शिक्षा
नरकलोक हा पाताळ लोकांच्या खाली आणि गर्भोदक् सागराच्या किंचित वर असून यमराजाच्या अधिपत्याखाली आहे. मृत्यूनंतर यमदूत पापी माणसांना तेथे आणतात आणि मग यमराज त्यांच्या विशिष्ट पापकृत्यांचा न्यायनिवाडा करून त्यांना योग्य त्या शिक्षेसाठी नरकात पाठवतात.
१. जो माणूस दुसर्याची पत्नी, मुले, पैसे लुबाडतो, त्याला तामिश्र या नरकात टाकले जाते. तेथे त्याला खायला प्यायला मिळत नाही. यमदूतांकडून जबर मारहाण होते.
२. जो माणूस दुसर्याला फसवतो आणि त्याची पत्नी, मुले यांचा उपभोग घेतो, त्याला अंधता मिश्र नरकात टाकले जाते. येथे त्याचे इतके हाल होतात की, तो स्वतःची बुद्धी आणि दृष्टी गमावतो.
३. जो माणूस रात्रंदिवस काम करून स्वतःच्या कुटुंबियांच्या उदरभरणासाठी अकारण हिंसा करतो, त्याला रौरव नरकात टाकले जाते. तेथे त्याने हत्या केलेले प्राणी त्याचा सूड घेतात.
४. जो माणूस इतरांना दुःखे देऊन जगतो, त्याला महारौरवात टाकले जाते आणि क्रव्याद नावांचे प्राणी त्याचा चट्टामट्टा करतात.
५. जो माणूस स्वतःचे जिव्हालौल्य पुरवण्यासाठी मुके प्राणी आणि पक्षी यांना जिवंत भाजून खातो, त्याला कुंभीपाक नरकात टाकले जाते. तेथे त्याला उकळत्या तेलात फेकण्यात येते.
६. ब्राह्मणांची हत्या करणार्यास कालसूत्र नरकात नेतात. तेथे खालून जाळ आणि वरून कडक सूर्यप्रकाश यांमुळे तो माणूस तेथे अर्थातच भाजून खाक होतो.
७. वैदिक मार्गापासून ढळणार्या माणसास असिपत्रवन नरकात पाठवतात. तेथे यमदूत त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत चाबकाने फोडून काढतात.
८. निरपराध नागरिकांना शिक्षा ठोठावणारे जुलमी राजे आणि सरकारी अधिकारी यांना सूकरमुख नरकात फेकतात. तेथे उसाप्रमाणे त्यांना पिळून काढले जाते.
९. इतरांची हत्या आणि छळ करणार्या माणसास अंधकूप नरकात फेकतात. तेथे त्याच्यावर हिंस्र प्राणी, पक्षी, सर्प, डास आक्रमण करतात आणि जगणे नकोसे करतात.
१०. घरातील वयोवृद्ध, मुलेबाळे आणि पाहुणे यांना भोजन न देता जो स्वतः प्रथम खातो, तो कावळ्याप्रमाणे असतो. अशा लोकांना कृमिभोजन नरकात टाकले जाते. तेथे ते १ लाख वर्षे खितपत पडतात आणि अखेर कृमी-किटकांचे भक्ष्य होतात.
११. जो माणूस दुसर्यांचे सोने, जडजवाहिर चोरतो, त्याला संदेश नरकात फेकतात. तेथे तप्त तांब्याच्या गोळ्यांनी त्याची त्वचा आणि जीभ जाळली जाते.
१२. अयोग्य-अकुलीन स्त्रीशी संभोग करणार्यास तप्तसूर्मि नरकात फेकतात. तेथे त्यांना तांब्याच्या तप्त मूर्तींना मिठ्या मारायला लावतात.
१३. अनैसर्गिक संभोग करणार्यास वर्जकंटक शालमली नरकात फेकतात. तेथे त्याला दातेरी काटे असलेल्या झाडांना टांगून ठेवले जाते.
१४. जो माणूस खोटी साक्ष देतो, व्यापार-व्यवहारात फसवणूक करतो. त्याला उंच डोंगरावरून निर्जल नरकात फेकण्यात येते. तेथे तो जबर घायाळ होतो.
१५. जो ब्राह्मण आणि त्याची पत्नी मद्यपान करतात, त्यांना अयःपान नरकात नेले जाते. तेथे यमदूत त्याच्या तोंडात लोहाचा तप्त रस ओततात.
१६. देवी भद्रकालीस मनुष्यबळी देऊन जे मांस खातात, त्यांना रक्षोगण भोजन नरकात टाकतात. तेथे त्यांचे बळी राक्षसांचे रूप घेऊन त्यांची चिरफाड करतात.
१७. जी माणसे सर्पाप्रमाणे द्वेषबुद्धीची आणि रागीट स्वरूपाची असतात, त्यांना दंदशूक नरकात टाकले जाते. तेथे सात फण्यांचे नाग त्यांना उंदराप्रमाणे खातात.
१८. जो पापमार्गाने पैसे मिळवून प्रौढी मिरवतो, त्याला सूचीमुख नरकात टाकले जाते. तेथे यमदूत त्याचा देह भोसकून छिन्न विछिन्न करतात.
शिक्षा भोगल्यानंतर सर्व पापी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात.
इ. नरकापासून वाचण्यासाठी भगवंताचे सतत नामस्मरण करणे हाच मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग !
महाराज परिक्षितांनी शुक्रदेवांना नरकापासून वाचण्यासाठी मनुष्याने नेमके कसे वागावे?, असा प्रश्न विचारला. त्यावर शुक्रदेव गोस्वामी म्हणाले, मृत्यू येण्यापूर्वी माणसाची काया, वाचा, मन शुद्ध राहिले नाहीत, तर त्याला नरकात अशा यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे माणसाने नेहमी शास्त्रानुसार वर्तन करावे. पापकर्मे करणे आणि मग पश्चाताप घेऊन क्षालन करणे, ही प्रक्रिया एखाद्या हत्तीस स्नान घालण्यासारखी आहे. माणसाचे अज्ञान हे सर्व पापांचे मूळ असून ते उखडले जात नाही, तोवर त्याची पापे चालूच रहातात. स्वतःशी प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचा, अहिंसक आणि दानी राहिला, तर त्याच्या सर्व पापांचा आपोआप नाश होतो. त्याची सर्व पापे धुऊन जातात. भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्याने व्यक्तीच्या सर्व पापकर्मांचा निश्चितपणे निचरा होतो. त्यासाठी भगवंताचे सतत नामस्मरण करणे, हाच मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंताच्या चिंतनात रमणारी माणसे सामान्यतः पापकर्मे करत नाहीत; परंतु त्यांच्या हातून ती चुकून झाली, तर भगवंत त्यांचे रक्षण करतात. भगवंताचे कोणतेही नाम कसेही घेतले, तरी हेच फळ मिळते यात शंका नाही.
– दिवंगत शाम लक्ष्मण तेंडोलकर, बोरिवली (पू.), मुंबई
(संदर्भ : गुरुपौर्णिमा विशेषांक, २०१५)