बारामती (पुणे) येथील ए.टी.एम्.च्या रकमेत ३ कोटींचा अपहार

बारामती (पुणे) – येथील विविध अधिकोषांच्या ए.टी.एम्.मध्ये भरण्यासाठी दिलेल्या ३ कोटी २ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड आस्थापनात शाखाधिकारी म्हणून काम करणार्‍या संदीप सुधाकर केतकर यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे आस्थापन विविध अधिकोशांच्या ए.टी.एम्.मध्ये रक्कम भरण्याचे काम करते. आस्थापनाच्या बारामती शाखेने रक्कम भरण्यासाठी २ मार्ग निश्‍चित केले आहेत. या मार्गावर वेगवेगळ्या ५४ ए.टी.एम्. केंद्रांवर रक्कम भरली जाते. १४ ऑक्टोबर २०२० या दिवशी बारामतीतील एका ए.टी.एम्. केंद्रात ५० सहस्र रुपयांची रक्कम अल्प असल्याचे आढळून आल्यानंतर आस्थापनाने सर्व केंद्रांचे लेखापरीक्षण केले. चौकशी केली असता एका मार्गावर १ कोटी ६३ लाख आणि दुसर्‍या मार्गावर १ कोटी ३९ लाख अशी ३ कोटी २ लाख रुपयांची रक्कम अल्प असल्याचे आढळून आले. संबंधित ए.टी.एम्.ला खोट्या नोंदी करून कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये त्या रकमा दाखवून आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.