मडगाव येथील कार्निव्हल मिरवणुकीतही कोरोना महामारीसंबंधीच्या नियमांचे पुन्हा सर्रासपणे उल्लंघन

मडगाव, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – पणजी शहरापाठोपाठ मडगाव शहरातून १४ फेब्रुवारी या दिवशी काढण्यात आलेल्या कार्निव्हल मिरवणुकीत मास्क न घालणे आणि सामाजिक अंतर न पाळणे या कोरोना महामारीसंबंधीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. ‘खा, प्या आणि मजा करा’, हा संदेश देणारी कार्निव्हल मिरवणूक पहाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. (असा संदेश देणारे पाश्‍चात्त्यांचे उत्सव साजरे केल्यावर जनता राष्ट्रासाठी कसला त्याग करणार ? पुढची पिढी ‘ख्या, प्या आणि मजा करा’ अशी चैनी निघाली नाही तरच नवल ! – संपादक) कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले.

मडगाव येथे कोलवा सर्कल-रवींद्र भवन-बोरकर सूपर स्टोअर (फातोर्डा) या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी एकूण ९ प्रवेशद्वारांमधून लोकांना प्रवेश देण्यात आला. प्रवेशद्वारावर आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी ‘थर्मल गन’चा वापर करून प्रवेश करणार्‍यांच्या शरिराचे तापमान तपासले. यंदा ‘लस घ्या, जीव सांभाळा’ हा मिरवणुकीचा मुख्य विषय होता. प्रवेशद्वारातून मास्क घालून प्रवेश केल्यानंतर लोक तोंडावरील मास्क हनुवटीवर ठेवत होते किंवा तो काढून ठेवत होते. मिरवणुकीला उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेकांनी मास्क घातले नव्हते, तसेच सामाजिक अंतर पाळले गेले नाही. मिरवणुकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा काही अंशी प्रयत्न केला. काही महिलांनी डोळ्यांभोवती घालण्यात येणारे कार्निव्हलचे मास्क घातले होते;

मात्र नियमानुसार तोंड आणि नाक झाकणारे मास्क घातले नव्हते. विशेष म्हणजे मिरवणुकीत विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेतेही मास्क न घालता आणि सामाजिक अंतर न पाळता गर्दीत फिरत होते. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देणारा चित्ररथ, कोरोना महामारीला अनुसरून जनजागृती करणारा चित्ररथ, भारतीय सेनेची प्रतिकृती असलेला चित्ररथ यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत एकूण ४० चित्ररथ सहभागी झाले होते.