जगाच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने असतांना रस्ते अपघातात १० टक्के लोकांचा मृत्यू होतो ! – जागतिक बँक

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतात जगातील वाहनांच्या तुलनेत केवळ १ टक्के वाहने आहेत; मात्र रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या १० टक्के आहे. भारतात आम्हाला या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जागतिक बँकेचे उपाध्यक्ष हार्टविग साफर यांनी केले आहे.

१. हार्टविग यांनी म्हटले की, भारतातील रुग्णालयांतील १० टक्के जागेचा वापर नेहमीच रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांसाठी केलेला असतो. रस्ते अपघातामध्ये विशेषतः गरिबांची संख्या अधिक असते. असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांचीही संख्या यात आहे. भारताने रस्ते अपघात रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. तमिळनाडूमध्ये रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे.

२. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९ मध्ये भारतात ४ लाख ४९ सहस्र रस्ते अपघात झाले. यात १ लाख ५१ सहस्र ११३ जणांचा मृत्यू, तर २ लाख ९७ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले.

३. भारताचे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, भारतात प्रतिदिन रस्ते अपघातामुळे ४१५ जणांचा मृत्यू होतो. त्यातही ७० टक्के मृत्यू होणार्‍यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील नागरिक असतात.