शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे झालेली श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथील पेशवे स्मारकाची दुरवस्था !

१० फेब्रुवारी १७७१ या दिवशी पेशव्यांनी देहली जिंकल्याचा पराक्रम केला होता. त्या निमित्ताने…

१० फेब्रुवारी १७७१ या दिवशी पेशव्यांनी देहली जिंकून तेथे भगवा ध्वज फडकावण्याचा पराक्रम केला. या दिवसाच्या निमित्ताने पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण करूया. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करतांना त्यांचे मूळ म्हणजे श्रीवर्धन येथील त्यांच्या स्मारकाची विदारक स्थिती प्रकर्षाने लक्षात आली. या स्मारकाची ही विदारक स्थिती दूर करून त्याचा सन्मान जपला जाण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांना आदरांजली ठरेल.

संकलक : सौ. वसुधा डिंबळे आणि श्री. सुनील ओजाळे

पेशवे यांच्या वास्तूचे प्रवेशद्वार (डावीकडे) आणि शेजारील पडझड झालेल्या भिंती

श्रीवर्धन गावामध्ये प्रवेश करतांना एक मोठी कमान असून त्यावर श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे प्रवेशद्वार असे लिहिले आहे. याच ठिकाणी पर्यटकांकडून पर्यटन शुल्कही आकारले जाते. पेशव्यांच्या येथील मूळ वास्तूतच पेशवे मंदिर आहे. या ठिकाणी मूळ वाड्याचा चौथरा असून, तेथे श्रीवर्धन नगरपालिकेने वर्ष १९८८ मध्ये श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर  उभारले. चौथर्‍यावर श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी आणि वस्त्र परिधान केलेला ब्राँझ धातूपासून निर्मित पूर्णाकृती पुतळा आहे. चौथर्‍याच्या दर्शनी भागावर श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचा चरित्रवृत्तांत अंकित केला आहे. या स्मारकाच्या परिसरात जाताच ते डागडुजीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट कळून येते. शिवाय आतील परिसरात फिरतांना तेथील इतिहासाची कल्पनाही पर्यटकांना येत नाही. तुटलेल्या भिंती- कठडे, रंग उडालेले बांधकाम, अस्वच्छता, बांधकाम साहित्याचा पडलेला राडारोडा, पुतळ्याचीही होत नसलेली देखभाल, पुतळ्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी ऐतिहासिक काही पहाण्यासारखे नसणे यांमुळे उत्साहाने भेट देण्यास आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो. प्रशासनाचे असे अक्षम्य दुर्लक्ष पाहून पर्यटक असंतोषही व्यक्त करतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या या स्थानी पेशव्यांचे कर्तृत्व सांगणारा इतिहास मूर्त स्वरूपात असावा, अशी पर्यटकांची अपेक्षा रास्त नाही का ?

पेशवे यांचा दुरवस्थेत असलेला पुतळा

सारे काही कागदावरच !

नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. स्मारकाच्या प्राथमिक आराखड्यासही मान्यता मिळाली होती. स्मारकासाठी राज्याच्या नगरविकास, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य या तीन विभागांकडून निधी देण्यात येईल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून संग्रहालय, ऑडिटोरियम या वास्तूंसह भव्य पुतळाही उभारला जाणार असल्याचे वृत्त होते. या सर्व घोषणांची कार्यवाही मात्र अजूनही प्रतीक्षेतच आहे. सध्या श्रीवर्धन शहरात असलेल्या पेशवे मंदिराचा परिसर हा खेळांसाठी वापरला जातो.

आता तरी प्रशासन लक्ष देईल का ?

ऐतिहासिक वास्तू या इतिहास घडवणार्‍या शिल्पकारांच्या कर्तृत्वाच्या साक्षीदार तर असतातच; परंतु भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या स्रोतही असतात आणि म्हणून त्यांचे महत्त्व वादातीत असते. पेशव्यांचे महाराष्ट्र आणि देश यांसाठीचे योगदान मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि हिंदु धर्मरक्षणाचे कार्य या कुळातील पराक्रमी नरोत्तमांनी केले आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर ही ठिकाणे पर्यटनस्थळे असून अशा ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. पर्यटक मोठ्या संख्येने पेशवे स्मारक पहाण्यासाठी जातात. खरेतर शासनाने ही वास्तू जतन करून त्याचे रक्षण करायला हवे. पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन चौपाटीवर आलिशान सोय केली आहे; परंतु या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही, हे अनाकलनीय आहे. पर्यटकांनी पेशवे स्मारक या संकेतस्थळावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहून तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि पेशव्यांच्या या स्मृतीस्थानाचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे.

श्रीवर्धन येथील पराक्रमी पेशवे !

श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोकण किनारपट्टीवरील मुख्य शहर आहे. ३ किलोमीटर लांबीचा अथांग, शांत समुद्रकिनारा हे श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहेच; पण त्याचसमवेत या शहराला गौरवशाली असा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसाही आहे. सोमजाई मंदिर, जीवनेश्‍वर मंदिर, राममंदिर, कुसुमादेवी मंदिर, श्री लक्ष्मी-नारायण मंदिर, वाकळघर-गंगादेवी अशा सुंदर मंदिरांचे सान्निध्य लाभलेले हे स्थान श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे जन्मस्थानही आहे. पेशव्यांचे मूळ गाव म्हणून आजही अनेक पर्यटक श्रीवर्धनला भेट देतात.

बाणकोट खाडीच्या उत्तरेस असलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव ! श्रीवर्धनच्या चित्पावन भट घराण्यातील बाळाजी विश्‍वनाथ हे सातार्‍याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारातील पहिले पेशवे ! श्रीवर्धन येथे पेशवे घराण्याची पिढीजात देशमुखी होती, अशी इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या वंशजांच्या दरबारात प्रधानमंत्री असणार्‍या पेशव्यांच्या काळात हिंदवी स्वराज्य अधिक विस्तार पावले. पेशव्यांचे प्रभावी राजकारण, मुत्सद्दीपणा, पराक्रम यांच्या जोरावर अटकेपार भगवा ध्वज फडकावला गेला. अशा या पराक्रमी कुळाचे श्रीवर्धन येथील जन्मस्थान मात्र अजूनही प्रशासनाकडून अवहेलना सहन करत उभे आहे.

पराक्रमी पेशव्यांच्या स्मृतीस्थळाचे जतन करणे आवश्यक !

असे म्हणतात, अब्दाली याला सिरहिंद प्रांतापर्यंत त्याची सीमा हवी होती. हा प्रांत चंडीगडजवळ आहे. मराठ्यांनी ती मागणी धुडकावत युद्धाचा पर्याय निवडला. या घटनेच्या साधारण १८५ वर्षांनी भारताची फाळणी झाली. ती धर्माच्या आधारे केली गेली. पानिपत युद्धाच्या आधी घडलेल्या सिरहिंदच्या घटनेचे मूल्य पुष्कळ मोठे आहे. जर पेशव्यांनी अब्दालीची ती मागणी मान्य केली असती, तर वर्ष १९४७ मध्ये फाळणीची सीमा कशावरून सिरहिंदपर्यंत आली नसती ? जो जो भाग परकीय मोगल आक्रमकांच्या हातात गेला, तिथे तिथे धर्मांधांची संख्या वाढली. पेशव्यांनी युद्धाचा पर्याय निवडून एकप्रकारे भारताच्या सीमांचेच नव्हे, तर हिंदूंचे, त्यांच्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. अशा या पराक्रमी पेशव्यांचा हा इतिहास येणार्‍या पिढ्यांना कळायला हवा. त्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे, त्यागाचे स्मरण ठेवणे आणि स्मृती जागृत ठेवणे, हीच त्यांच्या प्रती राष्ट्रभक्त समाजाची खरी कृतज्ञता ठरेल !