माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह जे बोलले होते ते मला करावे लागत आहे !  

पंतप्रधान मोदी यांचा कृषी कायद्यांवरून काँग्रेसला टोला !

नवी देहली – कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका काँग्रेसने पालटली असून तिने ‘यू-टर्न’ घेतला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेच्या उत्तरात राज्यसभेत केली. या वेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे जुने विधान वाचून दाखवले. त्यात मनमोहन सिंह यांनी शेतकर्‍यांना त्याचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते.

१. मोदी यांनी मनमोहन सिंह यांची विधान वाचून दाखवतांना म्हटले, ‘शेतकर्‍यांना हा अधिकार मिळायला हवा. कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची आवश्यकता आहेे. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था पालटण्याचा आमचा उद्देश आहे. वर्ष १९३० पासून असणार्‍या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे.’ त्यामुळे काँग्रेस माझे ऐकणार नाही, तर किमान मनमोहन सिंह यांचे ऐकेल. आम्ही कृषी क्षेत्रात पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, ‘जे मनमोहन सिंह बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे’, असे तुम्ही म्हटले पाहिजे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, नवीन कृषी कायद्यांमधील मूळ सूत्रांविषयी कुणी बोलत नाही. कृषी कायद्याचा जो मूळ गाभा आहे त्याविषयी कुणी बोलत नसून घाईघाईत कायदा संमत करण्यात आला वगैरे विषयांवर बोलले जात आहे. एवढे मोठे आपले कुटुंब आहे, तर थोडा गोंधळ होणारच. विवाहाच्या कार्यात नाही का एखादा पाहुणा पाहुणचार मिळाला नाही म्हणून नाराज होतो, तसाच प्रकार आहे, असे म्हणत या कायद्यांवर चर्चा करण्याचे आवाहन केले.