मार्च-एप्रिल २०२१ मध्ये हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना

‘११.३.२०२१ ते २७.४.२०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत कुंभक्षेत्री धर्मप्रसार आणि ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या सेवेला येणार्‍या साधकांसाठी सूचना पुढे दिल्या आहेत.

१. महत्त्वाच्या सूचना

अ. कुंभपर्वासाठी येऊ इच्छिणार्‍या साधकांची शारीरिक क्षमता चांगली असावी. सामान्यतः वय वर्षे १६ ते ६५ वयोगटातील साधक या सेवेत सहभागी होऊ शकतात. या सेवेसाठी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अस्थमा हे जुनाट रोग असलेल्या साधकांनी सहभागी होऊ नये.

आ. साधकांनी स्वतःच्या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची विस्तृत माहिती जिल्हासेवकांना द्यावी.

इ. कुंभपर्वासाठी येण्यापूर्वी सर्वांनी स्वतःच्या प्रत्येक वस्तूवर, उदा. भ्रमणभाष, प्रभारक (चार्जर), पेन, वही, चादर, उशी, हवेची उशी (‘एअर पिलो’), स्वेटर इत्यादींवर नाव लिहावे किंवा चिकटवावे.

ई. जेवणामध्ये काही पथ्य असल्यास त्याची विस्तृत माहिती नोंदणी अर्जामध्ये (‘रजिस्ट्रेशन फॉर्म’मध्ये) भरावी.

२. प्रवासासंबंधी सूचना

अ. हरिद्वार शहरात हरिद्वार रेल्वे स्थानक (HW), मोतीचूर  रेल्वे स्थानक (MOTC), ज्यालापूर  रेल्वे स्थानक (JWP), तसेच ऋषिकेश (RKSH) रेल्वे स्थानक या ठिकाणी रेल्वे गाड्यांचे थांबे आहेत. प्रत्येक गाडीला यापैकी वेगवेगळ्या स्थानकांसाठी अधिक आरक्षण असते. हे लक्षात घेऊन साधकांनी आरक्षणाची उपलब्धता लक्षात घेऊन तिकीट काढावे.

आ. काही राज्यांतून हरिद्वारसाठी रेल्वे गाड्या नाहीत; परंतु दिल्ली येथे जाणारी रेल्वे आहे. अशा ठिकाणच्या साधकांनी रेल्वे आरक्षण करतांना दिल्ली येथील देहली (DLI), नवी देहली (NDLS) अथवा हजरत निजामुद्दीन (NZM) येथपर्यंतचे आरक्षण करावे, तसेच या रेल्वेस्थानकांवरून हरिद्वारसाठीचे पुढील रेल्वे आरक्षण करतांना दोन्ही प्रवासांत पुरेसा कालावधी राहील, याची निश्‍चिती करावी.

इ. आयत्या वेळी आगगाडीचे तिकीट मिळणे कठीण असल्याने सर्वांचे येण्या-जाण्याचे तिकीट ‘कन्फर्म’ असावे.

ई. रेल्वे स्थानकावर साहित्याची चोरी होण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने सतर्क रहावे आणि स्वतःच्या साहित्यावर लक्ष ठेवावे.

उ. प्रवासात सहप्रवाशांनी खाद्यपदार्थ वा पेय दिल्यास ते घेऊ नये.

ऊ. प्रवासात भ्रमणभाषचा अधिक वापर केल्यास भ्रमणभाषची ‘बॅटरी’ लवकर ‘डिस्चार्ज’ होते. त्यामुळे इतरांना संपर्क करायला अडचण येेत असल्याने भ्रमणभाषचा आवश्यक तेवढाच वापर करावा.

ए. रेल्वे स्थानकावर आगगाडीच्या खिडकीमधून पर्स किंवा भ्रमणभाष चोरीला जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे खिडकीजवळचे आसन असल्यास मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात, तसेच भ्रमणभाषचा वापर सतर्कतेने करावा.

ऐ. ११ मार्च, १२, १४ आणि २७ एप्रिल या दिवशी कुंभपर्वातील मुख्य अमृतस्नान असणार आहे. स्नानांच्या दिवशी, तसेच आदल्या आणि दुसर्‍या दिवशी कुंभक्षेत्राची वाहतूक थांबवली जाते. त्यामुळे साधकांनी त्या दिवसांमध्ये येण्या-जाण्याचे नियोजन करू नये.

३. सेवेला येतांना समवेत आणावयाचे साहित्य

अ. स्वतःचे शासकीय ओळखपत्र, उदा. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), तसेच आधारकार्ड अवश्य आणावे. त्यांची एक झेरॉक्स प्रत घरी ठेवावी आणि एक समवेतही आणावी.

आ. मार्चचे प्रथम २० दिवस थंडी असते. या थंडीसाठी आवश्यक कपडे, उदा. स्वेटर, जॅकेट, ‘स्वेट टी-शर्ट’, ‘इनर’, ‘हॅण्ड ग्लोव्हज’, सुती पायमोजे, कानटोपी आणावेत.

इ. स्वतःची औषधे समवेत आणावीत. प्रवासाचे दिवस धरून जितक्या दिवसांसाठी सेवेचे नियोजन केले आहे, त्या कालावधी व्यतिरिक्त ४ – ५ दिवसांची औषधे समवेत आणावीत.

ई. स्वतःसमवेत मौल्यवान वस्तू, उदा. सोन्याचे दागिने, आवश्यकतेपेक्षा अधिक रोख रक्कम आणू नये.

४. निवासाच्या संदर्भात

अ. कुंभपर्वासाठी साधकांची निवासव्यवस्था गंगा नदीच्या वाळवंटावर तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्यांमध्ये (कापडाच्या तंबूमध्ये) केली जाईल.

आ. झोपण्यासाठी पलंगाऐवजी ‘एअर बॅग’ किंवा ब्लँकेटची व्यवस्था असेल.

इ. पाश्‍चात्त्य पद्धतीचे शौचालय उपलब्ध नसेल.

वरील सूचनांविषयी काही शंका असल्यास जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. श्रीराम लुकतुके यांना ७०१२०८५१८४ या क्रमांकावर संपर्क करावा.

जिल्हासेवकांना सूचना

१. कुंभक्षेत्री धुळीचे प्रमाण अधिक असल्याने या सेवेसाठी थंडीमुळे वाढणारे आजार (उदा. जुनाट सर्दी, दमा) असणार्‍या साधकांचे नियोजन करू नये.

२. तीव्र आध्यात्मिक त्रास असून त्रासाचे प्रकटीकरण होणार्‍या, तसेच तीव्र शारीरिक त्रास असणार्‍या साधकांना कुंभसेवेला पाठवण्याचे नियोजन करू नये.

कुंभपर्व काळात धन अथवा वस्तू स्वरूपात अर्पण करण्याची अमूल्य संधी !

या कुंभपर्वाच्या काळात ‘सत्पात्रे दानम्’ यानुसार दानधर्म केल्यास त्याचा साधनेसाठी १ सहस्र पटींनी लाभ होतो. या धर्मप्रसारसेवेत भारतभरातील १०० हून अधिक साधक सहभागी होणार आहेत. या सर्वांचा निवास, भोजन आदींसह अन्य अनेक गोष्टींची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी धन आणि वस्तू यांची आवश्यकता आहे. यासाठी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि अर्पणदाते यांनी या धर्मप्रसाराच्या कार्यात यथाशक्ती दान (अर्पण) करावे, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे. यासाठी आपण सनातन संस्थेचे साधक किंवा हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक, तसेच वाचकांनी सनातन प्रभातचे वितरक यांच्याशी संपर्क साधावा. कुंभपर्वात कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे, याची सूची संबंधितांकडून आपल्याला उपलब्ध होईल.