६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. पद्मनाभ साळुंके याच्या आईला गरोदरपणात आलेल्या अनुभूती !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा (गोवा) येथील चि. पद्मनाभ साळुंके याच्या आईला गरोदरपणात आलेल्या अनुभूती !

पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. पद्मनाभ साळुंके

१. गर्भधारणा होण्यापूर्वी

१ अ. नामजपाला बसल्यावर बाळकृष्णाच्या कोमल चरणांचे दर्शन होणे : नामजप करत असतांना डोळे बंद केल्यावर मला बाळकृष्णाच्या कोमल श्री चरणांचे दर्शन होत असे. इतर वेळी मला गुरुदेवांचे दर्शन होते. ‘आज असे का दिसते ?’, असा विचार माझ्या मनात आला; पण ते पहातांना माझ्या मनाला आनंद जाणवला.

१ आ. ‘आकाशातून प्रकाशाचा एक गोळा स्वतःत सामावला जात आहे’, असे जाणवणे : एकदा रात्री झोपत असतांना ‘आकाशमार्गातून प्रकाशाचा एक गोळा माझ्यात सामावला जात आहे’, असे मला जाणवले. तेव्हाही मला ‘आज आपल्याला असे का दिसले ?’, असे वाटले; पण या अनुभूतीनंतर माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता.

१ इ. रात्री झोपेत असतांना दोन देवींनी एक बाळ हातात देऊन ‘आता तुला याचा सांभाळ करायचा आहे’, असे सांगणे : दुसर्‍या दिवशी रात्री अर्धवट झोपेत माझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या समोर २ देवी आल्या. त्यांच्या हातांत एक बाळ होते. दोघींनी मिळून ते बाळ माझ्या हातात दिले आणि त्या म्हणाल्या, ‘आता तुला या बाळाचा सांभाळ करायचा आहे.’

वरील दोन्ही प्रसंग अनुभवल्यानंतर ‘बाळ थेट देवाकडून, म्हणजे आकाशमार्गातून माझ्या अंतरी सामावले आहे’, असा विचार देवाने मला दिला; परंतु हे सर्व अनुभवत असतांना ‘गर्भधारणा झाली आहे’, अशी कुठलीही लक्षणे मला दिसत नव्हती.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना गरगरणे आणि त्या वेळी ‘गर्भधारणा झाली आहे’, असा विचार मनात येणे : ११.५.२०१९ या दिवशी मी गुरुदेवांचा जन्मोत्सवाचा सोहळा पहात होते. माझे मन आनंदी आणि शांत होते. त्याच क्षणी मला थोडे गरगरले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मला गर्भधारणा झाली आहे’; पण वैद्यकीयदृष्ट्या पडताळणी केली नव्हती. त्यामुळे ‘माझ्या मनात आलेला विचार सत्य आहे का ?’, हे मला ठाऊक नव्हते; पण ‘तो विचार देवाचाच आहे’, असे मला वाटले.

सौ. अश्‍विनी साळुंके

२. जन्मापूर्वी

२ अ. १ ते ५ मास

२ अ १. गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर आलेल्या अनुभूती !

२ अ १ अ. तिसरा मास चालू असतांना गर्भासाठी विधी चालू असतांना आलेल्या अनुभूती : तिसरा मास चालू असतांना गर्भासाठी एक विधी करण्यात आला. तेव्हा

अ. कलशावर वाहिलेले फूल खाली पडले.

आ. त्यानंतर विधी चालू असतांना पर्जन्यवृष्टी झाली.

इ. नंतर गौरीपूजनासाठी ठेवलेल्या नारळावरील फूल खाली पडले.

तेव्हा वझेगुरुजी म्हणाले, ‘‘देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. आशीर्वाद स्वरूपात मिळालेली ही फुले तुमच्या केसांत माळा.’’ त्या वेळी पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती.

– सौ. अश्‍विनी कार्तिक साळुंके, फोंडा, गोवा. (४.१०.२०२०)

३. प्रसुतीचा ताण येणे, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भेट झाल्यावर त्यांनी ओटीत फळ घालून आशीर्वाद देणे आणि ‘काळजी करू नको, सर्व व्यवस्थित होईल’, असे सांगितल्यावर मन निश्‍चिंत होणे

नवव्या मासात मला प्रसुतीचा थोडा ताण आला होता. प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती होण्याच्या एक दिवस आधी रामनाथी आश्रमात याग होणार होता. त्या निमित्ताने मला आश्रमात जाता आले. तिथे मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटल्या. त्यांनी ‘मला तुझी आठवण आली होती’, असे सांगितले. नंतर त्यांनी माझ्या ओटीत फळ घालून आशीर्वाद दिला आणि माझ्या पाठीवरून अन् पोटावरून हात फिरवला. मी त्यांना ‘मला प्रसुतीचा ताण आला आहे’, असे सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुझी प्रसुती कधी झाली ?’ हे तुला कळणारही नाही. तू काळजी करू नकोस. सर्व व्यवस्थित होणार.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली आणि माझे मन निश्‍चिंत झाले. प्रत्यक्षात ऐन वेळी माझे शस्त्रकर्म करावे लागल्यामुळे ‘मी यातून कधी बाहेर पडले ?’, हे मला कळलेही नाही.

 ‘आई नामजप करत असतांना बाळाच्या सहस्रारचक्रातून संपूर्ण शरिरात ‘ॐ’ प्रवेश करत आहे’, या संदर्भात सौ. अश्‍विनी यांनी काढलेले चित्र


चि. पद्मनाभ साळुंके याच्या संदर्भात त्याचे वडील आणि आजी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. कार्तिक साळुंखे

१. पद्मनाभच्या अंगाला एक विशिष्ट गंध येणे आणि ‘तो घेतच रहावा’, असे वाटणे

पद्मनाभ ९ मासांचा असतांना मी त्याला भेटलो. त्या वेळी त्याचे बरेच गुण माझ्या लक्षात आले. त्याला जवळ घेऊन त्याची पापी घेतांना एक विशिष्ट प्रकारचा गंध त्याच्याकडून यायचा. ‘हा गंध अत्तराचा किंवा पावडरचा नसून वेगळाच आहे’, असे मला जाणवायचे आणि ‘तो गंध घेतच रहावा’, असे मला वाटायचे. तेव्हा मला पुष्कळ आनंद व्हायचा.

२. पद्मनाभच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. मनाची स्थिती चांगली नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘साधना चांगली होण्यासाठी साहाय्य करा’, अशी प्रार्थना करताक्षणी पद्मनाभने डोक्यावर हात ठेवणे आणि ‘जणू तो गुरुदेवांवर श्रद्धा ठेवा’, असे सांगत असल्याचे जाणवणे : एकदा पद्मनाभ माझ्यासमोरच बसला होता. त्या वेळी माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. ‘माझी साधना व्यवस्थित होत नाही’, या विचाराने मला पुष्कळ निराशा आली होती. मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली आणि मनातल्या मनात सांगितले, ‘माझी साधना होत नाही. तुम्हीच मला साहाय्य करा. तुम्हीच मला ‘सकारात्मक राहून साधना करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगा.’ मी मनातल्या मनात अशी प्रार्थना केल्याक्षणी पद्मनाभने त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि तो माझ्याकडे पाहू लागला. जणूकाही तो मला सांगत होता, ‘बाबा, काळजी करू नका. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न करा. ते तुम्हाला या सर्वांमधून बाहेर काढणारच आहेत.’

२ आ. ‘लहान मुलांची मने निरागस असल्यामुळे त्यांच्यामध्ये देवतांचे तत्त्व आकृष्ट होते’, या विचाराने पद्मनाभच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केल्यावर स्वतःच्या मनाच्या स्थितीत चांगला पालट होणे : ‘लहान मुले ही देवाघरची फुले असतात; कारण त्यांचे मन निरागस असते. त्यामुळे देवाचे तत्त्व त्यांच्याकडे सहजतेने आकृष्ट होते’, असे विचार माझ्या मनात आले. त्यामुळे एकदा मी पद्मनाभ माझ्या समोर बसला असतांना त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि देवाला प्रार्थना केली, ‘देवा, या लहान बालकाच्या माध्यमातून तूच मला चैतन्य दे. माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले सर्व आवरण दूर कर. तूच माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करवून घे.’ मी अशी प्रार्थना केल्यानंतर काही वेळातच माझ्या मनाच्या स्थितीत पुष्कळ पालट झाला.’

– श्री. कार्तिक साळुंके (वडील), देहली (जानेवारी २०२१)

३. सौ. शोभा साळुंके (पद्मनाभची आजी), फोंडा, गोवा.

अ. ‘पद्मनाभच्या सेवेत असतांना मी माझे दुखणे विसरून जाते. तेव्हा माझ्या मनाची स्थिती निर्विचार होते. मनाला आनंद जाणवून माझा नामजप आपोआप होतो.

आ. तो स्वतःहून आवरण काढतो. तेव्हा मलाही ‘आवरण काढायचे आहे’, याचे स्मरण होते.


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक