रांची, झारखंड येथील हिंदुत्वनिष्ठ लेखिका डॉ. रेणुका तिवारी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि साधक यांच्याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

‘गोवा हे एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. वर्ष २०२४ मध्ये फोंडा (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्ता म्हणून सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी विमानतळावर उतरल्यावर माझ्या निवासस्थानापर्यंत जाण्यासाठी एक गाडी आणि साधक यांचे नियोजन आयोजकांनी केले होते. माझ्या निवासाची व्यवस्था श्री शांतादुर्गा संस्थानाच्या परिसरातील एका सुंदर आणि स्वच्छ अशा अतिथीगृहात होती. येथील परिसर आणि साधकांची प्रेमळ वागणूक यांमुळे मी पुष्कळ प्रभावित झाले. 

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची वैशिष्ट्ये 

१ अ. सनातन संस्था ही संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध असणे : फोंडा (गोवा) येथे श्री शांतादुर्गा मंदिर आणि श्री रामनाथ मंदिर या दोन संस्थानांच्या मध्ये ‘हिंदूंना अभिमान वाटावा’, असा सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था ही संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.

१ आ. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असलेला हा आश्रम साधकांना साधना करण्यासाठी एक परिपूर्ण केंद्र बनले आहे.

१ इ. आश्रमात उच्च प्रतीचे तंत्रज्ञान वापरून अध्यात्मातील सूक्ष्म स्तरावरील चैतन्य किंवा सकारात्मकता यांचा अभ्यास केला जाणे : आश्रमात आधुनिक वैज्ञानिक उपकरणाचा (‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’चा) वापर करून ‘एखाद्या वस्तूमध्ये सात्त्विकता किती प्रमाणात आहे ? विविध रंगांचा प्रभाव कसा असतो ? संगीत आणि अध्यात्म यांच्या संयोगाने व्यक्तीच्या मनावर प्रभाव कसा पडतो ?’, इत्यादीं विषयी अभ्यास केला जातो.

डॉ. रेणुका तिवारी

१ ई. सनातन संस्थेच्या आश्रमात साधना करण्यासाठी भारतातून अनेक साधक येतात. साधक येथे राहून गुरुकृपा संपादन करतात आणि उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त करतात.

१ उ. सनातन संस्था ही साधकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे. येथे सर्वांना हिंदु धर्म आणि त्यातील आध्यात्मिक तत्त्वे यांविषयी मार्गदर्शन केले जाते.

२. आश्रमात प्रवेश केल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. सनातनच्या आश्रमात प्रवेश करताच अनेक विलक्षण अशा मनमोहक गोष्टी आपले स्वागत करतांना दिसून येतात, उदा. लहानशा तळ्यात कमळाचे पुष्प उमललेले दिसते.

आ. आश्रमाच्या स्वागतकक्षात श्रीकृष्णाचे चित्र आहे. त्यातील श्रीकृष्णाचे डोळे सजीव असल्यासारखे वाटतात.

इ. आश्रमात प्रवेश करताच एखादे कार्यालय असल्याचा भास होतो. भेद इतकाच आहे की, येथे साधक आणि साधिका आहेत अन् त्यांच्या मुखावर सुमधुर हास्य असते. त्यामुळे येथील वातावरण वेगळेच जाणवते.

ई. येथील व्यवस्था शिस्तबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक कार्य वेळेवर होत असते.

उ. साधक दिलेली सेवा शांतपणे आणि हसतमुख राहून करतात. ते वेगळ्याच प्रेरणेने प्रेरित असल्याचे दिसून येते.

ऊ. आश्रमाच्या स्वागतकक्षात आणि ध्यानमंदिरात असलेली देवतांची चित्रे अन् प्रतिमा सजीव वाटतात. ‘तुम्ही त्यांच्याकडे कुठूनही पाहिले, तरी ती चित्रे किंवा प्रतिमा तुमच्याकडेच पहात आहेत’, असे वाटते.

ए. येथे येणारे साधक श्रद्धावंत आहेत. ते गुरुचरणी समर्पित आहेत आणि त्यांना येथे आध्यात्मिक ऊर्जा मिळते.

३. सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांची वैशिष्ट्ये

अ. येथील साधकांच्या अंतर्मनात शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजली आहेत. हे साधकांचे वागणे-बोलणे यांतून लक्षात येते.

आ. साधक आणि साधिका संस्थेत चालणार्‍या कार्याविषयीची माहिती भावपूर्ण सांगतात. त्यांच्याकडे पाहून आंतरिक समाधान मिळते आणि आनंद होतो.

४. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित होणारे नियतकालिक ‘सनातन प्रभात’ ! : 

सनातन संस्थेने ‘हिंदु धर्माचा प्रसार आणि हिंदूसंघटन’ हे ध्येय ठेवले आहे. यासाठी ‘सनातन प्रभात’ या नावाने ४ भाषांमध्ये नियतकालिकांचे प्रकाशन केले आहे. या नियतकालिकांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी अन् संपूर्ण जगातील हिंदु धर्मासंबंधित वृत्ते प्रकाशित करण्यात येतात, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवला जातो.

– डॉ. रेणुका तिवारी, रांची, झारखंड. (सप्टेंबर २०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.