मुंबईत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी अटकेत

 ३५ लाख ५४ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त

वारंवार बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांचे जाळे सरकारने वेळीच उद्ध्वस्त करायला हवे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्यास असे कृत्य करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !

मुंबई – बनावट नोटा छापून त्यांची मुंबई शहरात विक्री करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारूख रसुल चौधरी या टोळीला घाटकोपर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ सहस्र, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या ३५ लाख ५४ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा, तसेच त्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या टोळीचे सदस्य पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील त्यांच्या रहात्या घरी बनावट नोटांचा छापखाना चालवत होते. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी किती बनावट नोटांची छपाई करून त्यांची बाजारात विक्री केली आहे, याविषयीचे अन्वेषण पोलीस करत आहेत.