स्वामी विवेकानंद यांनी भेट दिलेल्या ‘दामोदर साल’ या ठिकाणाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली भेट !
पणजी, १८ जानेवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी भेट दिलेल्या मडगाव येथील ‘दामोदर साल’ या ठिकाणाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद यांचे पवित्र वास्तव्य लाभलेल्या दामोदर साल या भूमीचे जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आणि ही जागा लोकांना पहाण्यासाठी संबंधित भूमी मालकाच्या सहकार्याने खुली करण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या विचारांचा संपूर्ण गोवाभर प्रसार व्हावा, यासाठी मडगाव येथे स्वामी विवेकानंद केंद्र खुले करण्यात येणार आहे.’’
शिकागो, अमेरिका येथे ऐतिहासिक संबोधन करण्यापूर्वी स्वामी विवेकानंद हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म जाणून घेण्यासाठी वर्ष १८९२ मध्ये गोव्यात आले होते. त्या वेळी त्यांचे वास्तव्य काही काळ मडगाव येथील दामोदर साल येथे होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोना महामारी, कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदी कार्यक्रम एकत्र आल्याने यंदा सरकारला ‘जनमत कौल दिन’ साजरा करणे शक्य झाले नाही. पुढच्या वर्षी ‘जनमत कौल दिन’ सरकार मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे.’’
स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने साखळी येथे नुकतीच युवकांची फेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद हे एक आदर्श पुरुष आहेत. आजच्या युवकांनी स्वत:ची आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.’’