जोडवाडी (जिल्हा संभाजीनगर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या


संभाजीनगर – तालुक्यातील जोडवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजपचे कार्यकर्ते हारसिंग काळू गुशिंगे (वय ५५ वर्षे) यांची हत्या करण्यात आली. ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपचे ३ सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित ४ जागांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याच रात्री ९ वाजता गुशिंगे यांच्यावर ६ जणांनी आक्रमण केले. यात त्यांचा मृत्यू झाला. (निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक) 

 

दोषींवर हत्येचा गुन्हा नोंद केल्यानंतरच शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी मागणी करत ग्रामस्थांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी मदन जारवाल, संजय बिमरोट, संजय सत्तावन, विजय सत्तावन, संतोष गुशिंगे, बिजू जारवाल या ६ जणांवर हत्येचा गुन्हा नोंद केल्यानंतर ग्रामस्थांनी गुशिंगे यांचे पार्थिव कह्यात घेतले. जोडवाडीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे ‘पॅनल’ होते. गुशिंगे यांचे पुतणे संजय गुशिंगे यांनी भाजप गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून त्यांच्या चुलत जावयासह वरील आरोपींना घेऊन हारसिंग यांच्या घरी जाऊन त्यांची हत्या केली.