भूसर्वेक्षणास विरोध करणार्‍या मेळावली ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर : ग्रामस्थांकडूनही दगडफेक

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण

वाळपई, ६ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला ६ जानेवारी या दिवशी हिंसक वळण लागले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ६ जानेवारी या दुसर्‍या दिवशी भूसर्वेक्षण अधिकार्‍यांना बंद करावे लागले. या वेळी ग्रामस्थांना तेथून पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर केला; मात्र ग्रामस्थांकडून दगडफेक होऊ लागल्याने पोलिसांना घटनास्थळावरून परत जावे लागले. या वेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत काही पोलीस आणि आंदोलन करणारे ग्रामस्थ घायाळ झाले आहेत. शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करावा या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत.

६ जानेवारी या दिवशी सकाळी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी पुन्हा गावात येणारा मुख्य रस्ता अडवला. आंदोलनकर्ते मुख्य रस्त्यावर असल्याचे पाहून भूसर्वेक्षण करणारे अधिकारी दुसर्‍या मार्गाने प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन भूमीचे सीमांकन करू लागले. ही गोष्ट आंदोलन करणार्‍यांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी सीमांकन करणार्‍यांच्या दिशेने मोर्चा वळवला आणि भूसर्वेक्षण करणार्‍यांचा त्यांनी पाठलाग गेला. यामुळे भूसर्वेक्षणाचे काम अर्ध्यावरच बंद करावे लागले.

यापुढे शस्त्रे हाती घेऊन आंदोलन करू ! – ग्रामस्थांची चेतावणी

भूसर्वेक्षणाचे काम यापुढेही चालूच राहिल्यास आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची चेतावणी दिली आहे. मेळावली ग्रामस्थांनी म्हटले आहे की, आंदोलनकर्ते गेले ४ मास शांततापूर्णरित्या आंदोलन करत आहेत; मात्र सरकारला शांततेचा विचार पटत नसेल, तर ग्रामस्थ कायदा हातात घ्यायला मागेपुढे पहाणार नाहीत. आंदोलकांनी घरामध्ये असलेली शस्त्रे घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि याला सर्वस्वी शासन उत्तरदायी ठरणार, अशी चेतावणी दिली आहे.

आंदोलनकर्त्यांचा वाळपई पोलीस ठाण्यावर मोर्चा : पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी

यानंतर दुपारी आंदोलनकर्त्यांनी वाळपई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. ग्रामस्थांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ, तसेच आंदोलनाला पाठिंबा दिलेले धामसे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर उपस्थित होते. या वेळी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुरुष पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलनकर्त्या महिलांचा आरोप

आंदोलनस्थळी पुरुष पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप महिला आंदोलनकर्त्यांनी केला. संबंधितांनी महिलांची क्षमा मागावी, अशी मागणी या महिलांनी केली अन्यथा सर्व महिला आंदोलनकर्त्या पोलीस ठाण्यावर जाणार असल्याची चेतावणी महिलांनी दिली.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या सीमांकनाचे काम चालूच रहाणार, आंदोलनकर्ते शांत होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचे सीमांकनाचे काम चालूच रहाणार, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मेळावली येथे आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आंदोलनकर्ते शांत होणार आहेत. आंदोलनकर्त्यांना प्रकल्पावरून चर्चा करण्यास मी सांगितले आहे; मात्र आतापर्यंत त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या ठिकाणी पोलीस चौकी उभारली जाणार आहे.’’

लाठीहल्ला केल्याच्या प्रकरणी विरोधी पक्षांतील राजकारण्यांची प्रतिक्रिया

  • शासनाने शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांवर निदर्यीपणे लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर केला. यामुळे भाजपची राजवट हुकूमशाही असल्याचे स्पष्ट होते. लोकांच्या भावनांचा विरोध करून सरकार कोणताही प्रकल्प राबवू शकणार नाही, असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. (काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या काळात गोरक्षकांचे आंदोलन अशाच प्रकारे आंदोलनातील संतांवर लाठीहल्ला करून उधळून लावले होते. काही संतांचा यात मृत्यूही झाला होता. योगऋषी रामदेवबाबा यांचेही देहली येथील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन रात्रीच्या वेळी आक्रमण करून काँग्रेसच्या देहली पोलिसांनी उधळले होते. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी भाजपला हुकूमशाही म्हणण्यापूर्वी स्वतःचे कर्तृत्व आठवावे, हे बरे ! – संपादक)
  • शेळ-मेळावली प्रकरण चिघळण्यासाठी मुख्यमंत्रीच उत्तरदायी आहेत, असे मत ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे मनोज परब यांनी व्यक्त केले, तर ‘आप’चे राहुल म्हांबरे म्हणाले, ‘‘ही मेळावलीवासियांच्या विरोधात राज्यशासनाची सालाझारशाही आहे.’’